जिल्हा

खासदार आढळराव आणि आमदार गोरे यांना भाऊ तरी किती : अमोल पवार यांचा सवाल

महेंद्र शिंदे

कडूस : सार्वजनिक क्षेत्रात काहीही योगदान नसताना खेड तालुक्यात आमदार आणि खासदार यांच्या भावांचा मोठा हस्तक्षेप वाढला आहे. यांना भाऊ तरी नक्की किती आहेत? हे आम्हां जनतेला अजून समजलेच नाही, असे स्फोटक वक्तव्य खेड पंचायत समितीचे विद्यमान सदस्य व माजी उपसभापती अमोल पवार यांनी कोहिंडे बु. (ता.खेड) येथे करून खेड तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. 

पवार हे खेड पंचायत समितीत काँग्रेस पक्षाचे एकमेव पंचायत समिती सदस्य आहेत. शिवसेनेने गेल्या दीड वर्षांपूर्वी पवार यांना बरोबर घेत त्यांना उपसभापतिपद बहाल करून पंचायत समितीवर भगव्याची सत्ता आणली होती. कालावधी पूर्ण झाल्यानंतर इच्छा नसतानाही पवार यांना उपसभापतिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे नाराज झालेल्या पवार यांनी पद सोडल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच शिवसेनेपासून 'यू टर्न' घेत आमदार सुरेश गोरे व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले.

यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये होणाऱ्या राजकीय उलथापालथीची झलक यातून दिसून आली आहे. जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या माध्यमातून 1 कोटी 25 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच कोहिंडे येथे झाला. यावेळी पवार यांनी हे विधान केले. यावेळी भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप मेदगे, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पवार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर दिवंगत माजी आमदार नारायणराव पवार यांच्या काम करण्याच्या पद्धतीचा दाखला देताना ते पुढे म्हणाले, `'ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा अपमान करून त्यांच्या नंतर आम्ही भाषणे करू, असा हट्ट हे भाऊ धरून ते चुकीच्या प्रथा पाडत आहेत. अनेक वर्ष समाजासाठी योगदान दिलेल्या व निष्ठावान पदाधिकाऱ्यांचा अपमान हे भाऊ करत असून ही गोष्ट चांगली नाही. स्वर्गीय नारायणराव पवार यांनी वीस वर्षे तालुक्याचे नेतृत्व केले. परंतु त्यांच्या कुटुंबातील एकाही सदस्याने कधीही कुठल्याही कामात हस्तक्षेप केला नाही. सार्वजनिक ठिकाणी नारायण पवार यांच्या ऐवजी हजेरी लावून त्यांच्या कामात लुडबुड केली नाही. त्यामुळे अनेक नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळाली. सध्या कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे.'

यावेळी पवार यांच्यासह बुट्टे पाटील, मेदगे यांनी देखील आक्रमक राजकीय भाषण केले. बुट्टे पाटील म्हणाले, 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनी आणि मसल पॉवरवाले समाजाचे नुकसान करत आहेत. मला जिल्हा परिषद निवडणुकीत पाडण्यासाठी अनेकांनी कोट्यवधी रुपयाचे नारळ फोडून भूमिपूजने केली, पण ही कामे मंजूरच नव्हती. त्यामुळे दोन वर्षात नारळ फोडलेले एकही काम होऊ शकले नाही.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT