खासदारांच्या कार्यक्रमाला आमदार कुपेकरही गैरहजर
खासदारांच्या कार्यक्रमाला आमदार कुपेकरही गैरहजर  
जिल्हा

खासदारांच्या कार्यक्रमाला आमदार कुपेकरही गैरहजर 

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडीक यांच्याकडून खासदार फंडातील विकास कामांच्या उद्‌घाटनाचा धडाका सुरू आहे. ज्या गावांत, ज्या दिवशी कार्यक्रम त्यादिवशी वृत्तपत्रात जाहीराती आणि गावांत डिजीटल फलक हे ठरलेले आहेत. जाहीरातीत आणि फलकावर त्या तालुक्‍यातील नेते, जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची छबी हे समीकरणही ठरलेले पण आतापर्यंत ज्या गावांत कार्यक्रम झाले त्याठिकाणी फलकावरील नेत्यांनी दांडी मारली. हीच परंपरा चंदगड तालुक्‍यातील आमदार संध्यादेवी कुपेकर यांनीही कायम ठेवली आहे. श्रीमती कुपेकर यांच्या गावांत खासदारांचा कार्यक्रम असूनही त्यांनी त्याकडे पाठ फिरवली. 

श्रीमती कुपेकर यांचे पुतणे व "गोकुळ' चे संचालक रामराजे कुपेकर यांच्या पत्नी म्हणजे खासदार महाडीक यांच्या भगिनी. जवळचे नातेसंबंध असूनही श्रीमती कुपेकर त्यांच्या कार्यक्रमाला का गेल्या नाहीत ? हा तालुक्‍यातील जनतेला पडलेला प्रश्‍न आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्यानंतर श्री. महाडीक यांना श्रीमती कुपेकर यांच्या मतदार संघातून जास्त मताधिक्‍य मिळेल असा अंदाज होता पण झाले उलटेच, याच मतदार संघात ते पिछाडीवर राहीले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हे मताधिक्‍य भरून काढायचे झाल्यास त्या मतदार संघात संपर्क वाढवून विकास कामे केली पाहीजेत या हेतून श्री. महाडीक यांनी या मतदार संघातील पाच-दहा गावांत कार्यक्रम ठेवला होता. 

घरच्याच आमदार आहेत म्हटल्यावर त्या येतील असे सर्वांनाच वाटले पण त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून येऊनही त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत पक्षविरोधात भुमिका श्री. महाडीक यांनी घेतली. श्रीमती कुपेकर ह्या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना खासदारांची काहीही मदत झालेली नाही. सर्वजण आपल्यासोबतच आहेत असे गृहीत धरूनच खासदारांची वाटचाल सुरू आहे पण प्रत्यक्षात "अंडरकरंट' वेगळाच असल्याचे त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या उपस्थितांवरून दिसत आहे. सरपंच, गावातील दोन-चार तरूण आणि रानात जाऊ न शकणारे वयोवृध्द एवढीच काय ती त्यांच्या कार्यक्रमाची उपस्थिती पहायला मिळत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT