जिल्हा

नांदेड जिल्हा परिषदेत नव्या चेहऱ्यांना संधी

सरकारनामा ब्युरो

नांदेड - जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नव्या चेहऱ्यांना संधी देत जुन्या व माजी पदाधिकाऱ्यांना बाजूला ठेवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर आजच्या निवडीच्या निमित्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये देखील एकीचे दर्शन दिसून आले. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सभापतीपदासाठी निवड करताना जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांना न्याय देण्याचाही प्रयत्न केला आहे.

जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या शीला दिनेश निखाते (ता. नांदेड), माधवराव गंगाधर मिसाळे (ता. देगलूर), राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुमती राजेश देशमुख कुंटूरकर (ता. नायगाव) व दत्तात्रय लक्ष्मण रेड्डी (ता. धर्माबाद) यांची निवड करण्यात आली. सभापती निवडीच्या वेळी वर्तविण्यात आलेले अंदाज आणि प्रत्यक्ष निवड यामध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली.

काही माजी सभापतींनी अध्यक्षांसोबत राहून आपल्याला पुन्हा एकदा सभापतीपदाची संधी मिळावी, यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. जुन्यांना बाजूला सारत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. चारही सभापती हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यापैकी मधुमती कुंटूरकर या पंचायत समितीच्या सदस्या व सभापती राहिल्या आहेत. बाकी तिघेही नवीनच चेहरे आहेत.

मागील वेळेस राष्ट्रवादीच्या गोरठेकर गटाला बाजूला ठेऊन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पाच वर्षे जिल्हा परिषदेवर सत्ता कायम ठेवली होती. यंदाही गोरठेकर गटाला डावलणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र श्री. चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांना सोबत घेतल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर मागील वेळेस सोबत असलेल्या राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या गटाच्या एका उमेदवाराला तूर्त तरी डावलले आहे.

खरे तर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात लोहा - कंधारमध्ये माजी आमदार धोंडगे यांच्या पुतण्याला सभापतीपद दिले जाईल, अशीच सर्वत्र चर्चा होती. मात्र, या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकी असल्याचे दिसून आले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी ‘सोशल इंजिनिअरींग’ चा फाॅर्म्युला वापरत सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सुरवातीला राष्ट्रवादीसोबत आघाडी करून जमवून घेत सत्ता काबीज केली आणि आता सभापतींच्या निवडीतही आघाडी घेत जिल्ह्यावर वर्चस्व ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता पुढील अडीच वर्षात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चांगली कामगिरी व्हावी, हा दृष्टीकोन समोर ठेऊन चारही सभापतींची निवड झाल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची ताकद नांदेड जिल्ह्यात वाढू नये, याची पुरेपुर काळजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र मिळून घेतलेली दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT