जिल्हा

नाट्यमय घडामोडींनंतर माळशिरसमध्ये राम सातपुते भाजपचे उमेदवार

मनोज गायकवाड

अकलूज : अनेक नाट्यमय घटना घडामोडीनंतर 'भाजप'ने माळशिरस विधानसभा मतदार संघातून राम सातपुते यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. त्यानंतर श्री सातपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान उत्तम जानकर यांनी भाजप ला सोडचिठ्ठी देत, राष्ट्रवादी कॉग्रेसकडून उमेदवारी दाखल केल्याने भाजपला बंडखोरीचा फटका बसला आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या माळशिरस मतदार संघात भाजपच्या जुन्या व नव्या नेत्यांमध्ये मोठी रस्सीखेच होती. या मतदारसंघावर आजवर मोहिते-पाटील परिवाराचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे येथे आपल्या गटाचा उमेदवार पाहिजे हा मोहिते-पाटील परिवाराचा आग्रह होता. तर जात प्रमाणपत्र वैध ठरल्यामुळे या जागेवर उत्तम जानकर यांनी दावा केला होता.

आजवर माळशिरसच्या राजकारणात मोहिते-पाटील व जानकर यांच्यात विळ्याभोपळ्याचे सख्य राहिले आहे. विधानसभेच्या निवडणुका त्याच अंगाने पार पडल्या आहेत. त्यामुळे मोहिते-पाटील व जानकर हे सद्या एकाच पक्षात असले तरी, त्यांचे राजकीय वैर कायम आहे. या परिस्थितीत जानकराना मोहिते-पाटील गटाचा तर, मोहिते पाटलांच्या उमेदवाराला जानकरांचा कडाडून विरोध होता. या दोघांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम सातपुते यांचा पर्याय तयारच ठेवला होता.

गुरुवारी माळशिरसची उमेदवारी मोहिते-पाटील गटाच्या डॉ विवेक गुजर यांना मिळाल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर रात्री श्री. जानकर यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश केला आणि आज उमेदवारी दाखल केली. दरम्यान, श्री जानकर यांच्या बंडखोरीची चाहूल लागताच भाजपने आपला उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. मोहिते-पाटील आणि जानकर या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने श्री सातपुते यांचे नाव पुढे केले आणि त्यास अनुमती देण्याशिवाय भाजपच्या जुन्या व नव्या नेत्यांना पर्यायच उरला नव्हता.

दरम्यान, मी भाजपचा कार्यकर्ता असून मी उमेदवारी दाखल केली आहे. डॉ गुजर आणि श्री सातपुते यांनी देखील उमेदवारी दाखल केली आहे, असे भाजपचे पंचायत समिती सदस्य अजय सकट यांनी सांगितले. त्यामुळे भाजपचा अधिकृत कोण याची आता चर्चा रंगली आहे.

श्रीकांत भारतीय यांची यशस्वी रणनितीः
सातपुते हे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अभाविप, भाजप युवा मोर्चा या पातळीवर त्यांनी काम केले आहे. माळशिरस मधून त्यानाच निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी मुख्यमंत्री कार्यालयाने केली होती. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांनी त्याची पायाभरणी केली होती. त्यामुळेच अनेक नाट्यमय घटना घडामोडीनंतर देखील राम सातपुते यांची भाजपची उमेदवारी निश्चित झाल्याचे आज अधोरेखीत झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT