sindhudurg fishermen criticize minister alsam shaikh
sindhudurg fishermen criticize minister alsam shaikh 
जिल्हा

मंत्र्यांनी सिंधुदुर्गच्या समुद्रात पाच सहा दिवस मासेमारी करावी!

सरकारनामा ब्युरो

मालवण (सिंधुदुर्ग): गेल्या पाच वर्षातील मत्स्योत्पादन स्थिर असल्याने मत्स्यदुष्काळ जाहीर करता येणार नाही, या मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा पारंपरिक मच्छीमारांनी आज तीव्र निषेध केला.

डॉ. सोमवंशी समिती अहवालाचा तसेच भारतीय विज्ञान संस्थेने दिलेल्या माहितीचा अभ्यास न करता शेख यांनी केलेले विधान मच्छीमारांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, अशी टीका तालुका श्रमिक मच्छीमार संघ, श्रमजीवी रापण संघ, नॅशनल फिशवर्कर्स फोरम या मच्छीमार संघटनांनी आज केली.

यावेळी छोटू सावजी, दिलीप घारे, रविकिरण तोरसकर, बाबी जोगी, गंगाराम आडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी काल विधानसभेत गेल्या पाच वर्षातील मत्स्योत्पादन स्थिर असल्याने मत्स्यदुष्काळ जाहीर करता येणार नाही, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा पारंपरिक मच्छीमारांनी तीव्र निषेध केला. 

श्री. सावजी म्हणाले,"मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी डॉ. सोमवंशी समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यापूर्वी केलेले विधान चुकीचे आहे. मत्स्यव्यवसाय खात्याने जी मत्स्योत्पादनाची आकडेवारी दिली त्यावरून जे विधान केले यातून त्यांनी आपले अज्ञान प्रकट केले आहे. त्यामुळे त्यांनी आझाद मैदानावर मच्छीमारांसमोर आमने सामने यावे.'' 

श्री. घारे म्हणाले, "मासेमारी शेती या प्रकारात मोडत नाही असे सांगणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने असतील आणि मत्स्यव्यवसाय मंत्री जर पारंपरिक मच्छीमारांना मत्स्यदुष्काळाच्या खाईत लोटत असतील तर अशा मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी. पर्ससीन, एलईडी मासेमारीमुळे मत्स्य प्रजाती नष्ट होत नाहीत असे मत्स्यव्यवसाय मंत्र्यांचे म्हणणे असेल तर त्यांनी सिंधुदुर्गच्या समुद्रात पाच सहा दिवस मासेमारी करून किती मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या याचा अभ्यास करावा.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT