जिल्हा

माजी आमदार दिलीप माने, इंदुमती अलगोंडांसह २६ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला 

सरकारनामा ब्युरो

सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने, इंदुमती अलगोंडांसह २६ जणांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. बी. हेजीब यांनी शुक्रवारी (ता.२२) फेटाळला.

तत्कालीन संचालक महादेव चाकोते, अहमद निंबाळे व सचिव उमेश दळवी व धनराज कमलापुरे यांना मात्र जामीन मंजूर केला आहे. 

चाकोते, निंबाळे, दळवी आणि कमलापुरे यांना ५० हजार रुपयांच्या जातमचुलक्‍यावर पोलिस ठाण्यात रोज हजेरी लावणे व साक्षीदारांवर दबाव न आणण्याच्या अटीवर हा जामीन देण्यात आला. 

या गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन सभापती दिलीप माने, इंदुमती अलगोंडा यांच्यासह अनेक दिग्गज संचालकांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतील सिद्धेश्‍वर शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

२०११ ते २०१६ कालावधीत बाजार समितीत झालेल्या गैरव्यवहारातील १४ मुद्‌द्यावर प्रशासक सुरेश काकडे यांनी तत्कालीन संचालक व सचिवांवर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 

अटकपूर्व जामिनासाठी संचालकांनी व सचिवांनी न्यायालयात धाव घेतली होती. सर्व जामीन अर्ज एकाच न्यायालयात चालवावेत, तत्कालीन संचालकांनी सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहावे, मोबाईल क्रमांक सादर करावे, अशी मागणी सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आली. 

या मागणीनुसार न्यायालयाने आदेश दिले. तत्कालीन संचालक गैरहजर राहिले, त्यांनी मोबाईल क्रमांकही सादर केले नाहीत, त्यांनी सादर केलेले माफीचा व मुदतवाढीचा अर्ज करण्याची तरतूद कोणत्याही कायद्यात नसल्याचा मुद्दा सरकार पक्षाच्या वतीने मांडण्यात आला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रदीपसिंग रजपूत, बाजार समितीच्या वतीने अॅड. उमेश भोजने, आरोपीच्या वतीने अॅड. धनंजय माने, अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. भारत कट्टे, अॅड. शशी कुलकर्णी यांनी काम पाहिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT