Yavatmal District Bank Election Mahavikas Aghadi To Decide Formula Soon
Yavatmal District Bank Election Mahavikas Aghadi To Decide Formula Soon 
जिल्हा

यवतमाळ जिल्हा बँक निवडणूक - महाविकासचा 'फाॅर्म्यूला' लवकरच

चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करून लढण्यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. त्यानुसार जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरविण्यासाठी शनिवारी (ता.22) महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार आहे.

वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेली बॅंक आपल्या ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते प्रयत्नरतत आहेत. नेत्यांचे एकमत झाले असले तरी संचालक मात्र द्विधा मन:स्थितीत आहेत. यामुळे महाविकास आघाडीला किती बळ मिळते अशी चर्चा असतानाच आता आघाडीच्या नेत्यांची दुसरी महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी (ता. 22) होणार आहे. गेल्या आठवड्यात नेत्यांची बैठक झाली होती. यात महाविकास आघाडी करून निवडणूक लढण्यावर एकमत झाले होते. त्यानंतर जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी दुसरी बैठक होणार आहे. 

यात तालुकागट तसेच जिल्हागटातील उमेदवारांच्या यादीवर प्राथमिक चर्चा होणार आहे. यावेळी तालुकागटासोबत जिल्हा गटातही उमेदवारीवरून मोठी चढाओढ सूरू आहे. परिणामी आपल्या मर्जीतील संचालकांना पाठविण्यासाठी विद्यमान ज्येष्ठ संचालकांना घरचा रस्ता दाखविला जाण्याची तयारी सुरू आहे. बॅंकेतील अनुभवी नेत्यांचे मतदारसंघ बाद झाले आहेत. तर पक्षाचे पदाधिकारी बॅंकेत येण्याची जुळवाजुळव करीत आहे. अशा स्थितीत त्यांना 'सेट' करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. 

महाविकास आघाडीत 'फिप्टी-फिप्टी'चा फॉर्म्यूला ठरल्यास एकाच्या वाट्याला सात जागा येण्याची शक्‍यता आहे. असे झाल्यास ज्येष्ठ संचालकांची कोंडी होणार आहे. त्यामुळे त्यांना बाजूला सारून नवीन 'व्यावसायिक' संचालक बॅंकेत आणण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. परिणामी शनिवारी होणाऱ्या बैठकीला विशेष महत्त्व आले आहे. याच बैठकीत कुणाचा राजकीय 'गेम' करायचा यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्‍यता आहे.

तीन सुनावण्या महत्त्वाच्या

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक़्रम प्राधीकरणाने जाहीर केला आहे. असे असले तरी दोन न्यायालयाच्या तसेच एक 'ज्वाइंट रजिस्ट्रार' यांच्याकडील सुनावणी अद्याप झालेली नाही. 17, 18 व 20 फेब्रुवारीला यावर निर्णय अपेक्षित आहे. यामुळेच या सुनावणी झाल्यानंतर शनिवार (ता.22) महाविकास आघाडीची बैठक बोलविण्यात आली आहे.

जिल्हागटासाठी लॉबिंग

जिल्हा गटातील दोन जागांवर आपली वर्णी लागावी यासाठी विद्यमान संचालकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी नेत्यांच्या गाठीभेटी मुबंईत सुरू आहेत. यवतमाळ, दारव्हा तालुक्‍यातील संचाकांची दोन नावे निश्‍चित मानली जात असून आर्णी तालुक्‍यातील शिक्षक नेत्यानेही शिवसेना नेत्यांशी जवळीव वाढविल्याची चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT