BJP MLA Suresh Khade Found Corona Positive
BJP MLA Suresh Khade Found Corona Positive 
कोल्हापूर

मिरजेचे आमदार सुरेश खाडे कोरोना बाधित, कुटुंबातील सहाजणांनाही बाधा 

सरकारनामा ब्युरो

मिरज : भाजपचे मिरज विधानसभा मतदार संघाचे आमदार, माजी सामाजिक न्याययमंत्री सुरेश खाडे यांच्यासह कुटुंबातील सहाजणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ते मिरज येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. आपली प्रकृती ठणठणीत आहे, कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसत नाहीत, समर्थकांना चिंता करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

कोरोना संकट काळात पहिल्या टप्प्यात सुरेश खाडे यांनी आपल्या मूळ गावी पेड (ता. तासगाव) येथे राहणे पसंत केले होते, मात्र लॉकडाऊन दीर्घकाळ वाढत गेला. लोकांवर संकट आले. कार्यकर्ते अस्वस्थ व्हायला लागले. त्यानंतर त्यांनी मैदानात उतरून लोकांना आधार द्यायला सुरवात केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी नाहक कन्टेंमेंट झोन लावल्याबद्दल महापालिकेच्या यंत्रणेची खरडपट्टी केली होती. जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय येथील बैठकांना हजेरी लावून त्यांनी लोकभावना प्रशासनापर्यंत पोहचवल्या होत्या. 

त्यांच्या कुटुंबातील काहीजण व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असायचे. बहुदा त्यामुळे कोरोनाची बाधा झाली असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आमदार खाडे यांचे स्वीय सहायक आणि त्यांचे बॉडी गार्ड यांचीही कोरोना तपासणी करण्यात आली आहे. ते दोघेही निगेटिव्ह आले आहेत, मात्र त्यांना घरातच थांबण्याची सूचना देण्यात आली आहे. आमदार खाडे म्हणाले, "काही चिंता करण्याचे कारण नाही. माझी व कुटुंबियांची प्रकृती उत्तम आहे. डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली असावे म्हणून रुग्णालयात दाखल झालो आहोत. कार्यकर्ते, समर्थक साऱ्यांनी आपापली काळजी घ्यावी. सुरक्षित रहावे.''
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT