Rane---Lad
Rane---Lad 
कोल्हापूर

भाजपची रणनीती: तळकोकणात नारायण राणेंच्या मदतीने शिवसेनेला  करणार बेजार

संदेश सप्रे

देवरूख  :  राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी सेना-भाजपमध्ये युतीबाबत गुऱ्हाळ सुरू असताना युती न झाल्यास स्वतंत्रपणे लढण्यासाठी भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची जबाबदारी विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्याकडे दिली आहे. 

युती न झाल्यास तळकोकणात स्वाभिमानला हाताशी धरून शिवसेनेला बेजार करण्याचे तंत्र भाजपने अवलंबले आहे. भाजपला यात किती यश येणार,हे येत्या काही महिन्यातच स्पष्ट होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. माजी खासदार नीलेश राणेंचा तब्बल दीड लाखांच्या फरकाने पराभव करीत सेनेने हा मतदारसंघ आपल्याकडे घेतला. सद्यस्थितीत सिंधुदुर्गात केवळ नितेश राणे वगळता उर्वरित सर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य आहे. यामुळे यावेळीही येथील लढत सेनेसाठी सोपी जाणार अशी चर्चा आहे.

 शिवसेनेने गाफील न राहता मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून युतीची चाचपणी सुरू झाली आहे. सेनेकडून त्याला प्रतिसाद मिळत नाही. गेले सहा महिने आमदर लाड हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत कार्यरत आहेत. सिंधुदुर्गात राणेंच्या स्वाभिमान रूपाने भाजपला आशा आहे. रत्नागिरीत भाजपची मते वाढली असली तरी ती निर्णायक ठरविण्याच्या दृष्टीने लाड कार्यरत आहेत. तळकोकणात राणेंची आश्‍वासक साथ मिळाली तर दोन्ही जिल्ह्यातून सेनेला घायाळ करण्याची रणनीती सध्या भाजपमध्ये सुरू आहे.

प्रसाद लाड यांच्यामागे ताकद
राज्यात युती झाली तर हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला जाईल. त्यावेळी राणेंच्या स्वाभिमानचा झेंडा पुढे करून सेनेच्या वाटेत अडथळे आणण्याची तयारीही यानिमित्ताने करण्यात येत आहे. राणे आणि शिवसेनेत विळ्या भोपळ्याचे सख्य आहे. याचाच फायदा उठवण्यासाठी प्रसाद लाड यांच्या मागे पक्षाने लागेल ती ताकद उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT