mushrif-Narke
mushrif-Narke 
कोल्हापूर

मुश्रीफांचा गौप्यस्फोट : मुख्यमंत्र्यांना फोन करा असे नरकेच मला सांगायचे 

निवास चौगले

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा विळखा पडल्यानंतर पहिले चार दिवस शासन किंवा प्रशासनाची कोणतीही मदत पूरग्रस्तांना झालीच नाही, त्यामुळे यात शेतीसह लोकांच्या प्रापंचिक साहीत्याचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केला.

सरकार काय करत नाही हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी मला मुख्यमंत्र्यांना  फोन करण्याची विनंती करून मदत मागवा असे सांगितल्याचा गौप्यस्फोट केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारी महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या करवीर तालुक्‍यातील आंबेवाडी, चिखली, वरणगे-पाडळी, निटवडे आदि गावांचा दौरा केला. या दौऱ्यात श्री. मुश्रीफ यांनी संधी मिळेल तिथे सरकारवर निशाणा साधताना आमदार नरके यांनाही आपले लक्ष्य केले. 

आंबेवाडी येथे बोलताना आमदार नरके यांनी आपण सहा दिवस कशा पध्दतीने आंबेवाडी, चिखली येथे थांबून लोकांना मदत केली हे सांगितले. त्यावर बोलताना श्री. मुश्रीफ म्हणाले,"श्री. नरके हे सत्ताधारी पक्षाचे आहेत, त्यामुळे त्यांना सरकारच्या विरोधात बोलता येत नाही. पण महापुराच्या काळात पहिले चार दिवस कोणतीही सरकारी मदत पूरग्रस्त भागात मिळाली नाही, त्यामुळे पूरग्रस्तांचे हाल फार झाले. त्यावेळी श्री. नरकेच मला फोन करून मुख्यंत्र्यांना फोन करा आणि जास्तीत जास्त बोटी आणि मदत मागवा असे सांगत होते.' 

चिखली येथे श्री. पवार यांनी भेट दिली. त्यावेळी बोलताना श्री. पवार म्हणाले,"आम्ही आता सत्तेत नाही पण सरकारला तुम्हाला मदत करायला सांगू.' यावर श्री. मुश्रीफ यांनी आमदार नरके यांच्याकडे बोट करून "ह्यो सत्तेत आहे बघा' अशी टिप्पणी करत पुन्हा एकदा श्री. नरके यांचा चिमटा काढला. 

आंबेवाडी येथे श्री. नरके यांनी केलेल्या मदतीचा संदर्भ घेत करवीरचे माजी आमदार व कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी आपणही मदत केली पण ती प्रसिध्दीसाठी नाही, लोकांच्या हितासाठी होती असा टोला श्री. नरके यांचे नांव न घेता लगावला. 
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT