Hasan Mushrif Sarkarnama
कोल्हापूर

Hasan Mushrif: अजितदादांनंतर राष्ट्रवादी कमकुवत करण्याचा डाव? मुश्रीफांनी विरोधकांना सुनावले; शरद पवार, सुनेत्रावहिनींबाबतही मोठे विधान

Hasan Mushrif on NCP Merger Update:राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर हसन मुश्रीफांचा विरोधकांवर हल्लाबोल. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार एकसंघ असल्याचा दावा.

Rahul Gadkar

Kolhapur News: "उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व आमदार एकसंघ आहोत, कोणीही कुठेही जाणार नाही आणि आमदारांचा दुसरा गट होण्याची तर शक्यताच नाही. पक्षांतर्गत जे काही विषय असतील ते आमचं आम्ही सोडवून घेऊ, पण यामध्ये दुसऱ्यांनी नाक खुपसण्याची काही गरज नाही. एखाद्या पक्षाचा नेता आपल्यातून निघून गेल्यानंतर त्या पक्षाला कमकुवत कसे करता येईल, हा प्रयत्न काही मंडळी करीत आहेत. त्यांचा हा डाव कधीही यशस्वी होणार नाही," अशी स्पष्ट प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात दिली.

संजय राऊत हे महान नेते आहेत. ते राज्याचे मुक्त विद्यापीठ आहेत, त्यांनी काय बोलावे आणि काय बोलू नये याला कोणाचे काही बंधनच राहिलेले नाही. वास्तविक आमच्या पक्षाची त्यांना एवढी काळजी का लागावी हेच समजत नाही. त्यांचा जो शिवसेना पक्ष आहे, त्यांचे खासदार, आमदार किती आले, किती गेले, त्यावरती ते बोलत नाहीत. विनाकारण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच बोलत आहेत. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्यांना सूचना करीत आहे, त्यांनी आमच्या पक्षामध्ये नाक खुपसण्याची गरज नाही.

शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, संजय शिरसाट, त्यांचे रायगडमधील नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांबद्दल फार वाईट भाषेत टीका करीत आहेत. अतिशय भयानक बिनबुडाची वक्तव्ये करीत आहेत. महायुतीच्या तिन्ही पक्षांची आमची नेत्यांची समन्वय समिती आहे. यामध्ये आमची सातत्याने चर्चा होत असते की महायुतीमधील पक्षावर आम्ही बोलायचे नाही. काही तक्रारी असतील तर नेते मंडळींच्या कानावर घालायच्या. परंतु; ही मंडळी काही थांबायला तयार नाहीत.

मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करेन की, त्यांनी अत्यंत कडक शब्दांत यांना सूचना दिली पाहिजे. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार हे लोक करीत आहेत. संजय शिरसाट आणि त्यांच्या नेते मंडळींनी अशा वादविवादापासून, वक्तव्यांपासून लांब राहिले पाहिजे आणि आपल्या तिन्ही पक्षांत वाद होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत नेमकी काय परिस्थिती आहे या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, आठवडाभर मी मुंबईला गेलेलो नाही. गोकुळ आणि दिवाळीच्या निमित्ताने मी इकडेच आहे. कालच सुनेत्रावहिनी यांनी सांगितलेले आहे की, योग्य वेळ येताच याची सर्व माहिती देऊ. मला वाटते, त्या याबाबत योग्य तो निर्णय घेतील आणि त्या पक्षाचे नेते शरद पवारसाहेब निर्णय घेतील. निर्णय काय घ्यायचा हे या दोन्ही नेत्यांनी ठरवायचे आहे. सुनेत्रावहिनी जो निर्णय घेतील त्याच्या मागे आम्ही सर्वजण ठामपणे उभे राहू.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब यांची राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील काही आमदारांनी भेटीसाठी वेळ मागितली होती. या विषयाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, मी राष्ट्रवादीचा आमदार आहे, मला तरी काही तसा निरोप आलेला नाही. ज्याअर्थी मला निरोप नाही, त्याअर्थी कोण आमदार भेटणार आहेत याची मला कल्पना नाही. एखाद्या पक्षाची विनाकारण बदनामी करणे हे योग्य नाही. ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब यांच्या प्रकृतीबाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले, "आता मुंबईला गेल्यानंतर त्यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहे,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT