कोल्हापूर

मंडलिकांना डिवचण्यासाठी हे मी म्हणत नाही!

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : माझी अवस्था ही कल्हईच्या भांड्यासारखी झाली आहे, त्यामुळेच कोणही येतंय आणि ठोका मारून जातयं. मलाही उत्तरे देऊन कंटाळा आलाय असा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नांव न घेता खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी लगावला.  

जिल्हा बॅंकेचे संचालक असलेल्या व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या आमदारांचा सत्कार प्रा. मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले," जुन्या काळात जे आमदार, खासदार आहेत ते बॅंकेचे संचालक असायचे पण बॅंकेच्या इतिहासात संचालक झालेले नंतर आमदार, खासदार झाले ही घटना पहिल्यांदाच घडली. जिल्ह्यात आम्ही एकावर आलो पण राज्यात आम्ही सत्तेत आलो आहे. माणसांचे प्रश्‍न सोडवले जावेत ही भुमिका मतदारांनी घेतली आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून जिल्ह्याचा अर्थिक चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्यांना अर्थिक बळ दिले, याच पध्दतीचे काम यापुढे समन्वयाने करायचे आहे.'

यावेळी श्री. मुश्रीफ म्हणाले,"सलग पाचव्यावेळी मला निवडून देण्यासाठी सर्वच मतदारांनी, कार्यकर्त्यांनी अविरत कष्ट घेतले, त्या सर्वांचे मी आभार मानतो. या निवडणुकीत मला अनेक वर्षे जिल्हा बॅंकेचा संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, या बॅंकेचा फार मोठा फायदा झाला. आघाडी झाल्यानंतर जिल्ह्याचे चित्र कसे राहीले हे महिन्यापुर्वीच मी कथन केले होते. एक जागा सोडली तर सर्वच जागांवर युतीचा धुव्वा उडाला. प्रा. संजय मंडलिक इथे आहेत म्हणून त्यांना डिवचण्यासाठी हे मी म्हणत नाही.'

ते म्हणाले,"निवडणुकीपुर्वी आपल्यासमोर कोणच पैलवान नाही अशा भावना मुख्यमंत्री बोलून दाखवत होते. समोर पैलवान नाही, समोर कोणच नाही, पण आपण लोकांना गृहीत धरले तर काय होऊ शकते याचा अनुभव या निवडणुकीत आला. आम्ही निवडणुकीत विजय हा विनयाने स्विकारला आहे. लोकांनी आम्हाला विरोधी पक्षात बसण्याची संधी दिली आहे. पाच वर्षे काम करण्याचा जनादेश मिळाला आहे, आमची संख्या वाढलेली आहे, अतिशय प्रसिध्द चेहरे विधानसभेत आले आहेत.'

पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वच राज्यात सत्तारूढ गटाची घटलेल्या संख्येमागे शेतकऱ्यांची अनास्था, त्यांच्या प्रशनाकडे केलेले दुर्लक्ष आणि शेतकऱ्यांचा अपमान हे कारणीभूत आहेत. याचे प्रत्यंतर या निवडणुकीत दिसले आहे, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले. यावेळी आमदार राजेश पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचीही भाषणे झाली.

स्वागत संचालक भैय्या माने यांनी केले. कार्यक्रमाला संचालक पी. जी. शिंदे, अनिल पाटील, विलास गाताडे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, आर. के. पोवार, उदयानी साळुंखे, रणजितसिंह पाटील, संतोष पाटील आदि उपस्थित होते. आभार कार्यकारी संचालक डॉ. ए. बी. माने यांनी मानले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT