Hassan Mushriff Took Darshan of Halsiddhanath
Hassan Mushriff Took Darshan of Halsiddhanath 
कोल्हापूर

मुश्रीफसाहेब, तुमच्यामुळे आमचा पाणी प्रश्न मिटणार; आप्पाचीवाडी ग्रामस्थांचा आशिर्वाद

सरकारनामा ब्युरो

म्हाकवे : मुश्रीफसाहेब, तुम्ही मंत्री झाल्यामुळे आम्हा सीमावासीयांचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार आहे, असा आशावाद अप्पाचीवाडी (ता. चिक्कोडी) येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला. येथील श्रीक्षेत्र हालसिद्धनाथाच्या दर्शनासाठी मंत्री हसन मुश्रीफ आले असता ग्रामस्थांनी त्यांचा मिरवणूक काढून सत्कार केला.

शेतकऱ्यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर काळम्मावाडी धरणाच्या कालव्यातून पाणी म्हाकवेपासून पुढे सीमाभागात पोहोचतच नसल्याच्या तक्रारी केल्या. पाच वर्षात अनेक तक्रारी करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडूनही महाराष्ट्र सरकारने आणि अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

श्री. मुश्रीफ म्हणाले, "शेतीच्या पाण्याची काळजी करू नका. जरी तांत्रिकदृष्ट्या सीमाभाग हा कर्नाटक राज्यात असला तरी इथली मराठी जनता हे आमचे भाऊ आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील कराराप्रमाणे तुम्हाला पाणी देण्यासाठी सकारात्मक प्रयत्नशील राहू.''

मंत्रिपदाची शपथ घेताना सीमाभागासह जय महाराष्ट्र या मंत्री मुश्रीफांच्या शब्दांचा संदर्भ घेत येथील राजाराम खोत म्हणाले, "साहेब, तुम्ही सीमाभागासह जय महाराष्ट्र म्हणालात. त्यामुळे आमचा ऊर अभिमानाने भरून आला. तुम्ही मंत्री झाल्यामुळे आमच्या हक्काचा माणूस महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्याची आम्हा सीमावासीयांची भावना आहे.'' राजाराम खोत, विश्वास आबने, संजय कोकणे, दिलीप पटेकर, विलास पटेकर, सुरेश आडके, बाळासो गवंडी, सुरेश पोटले, अप्पासाहेब शेंदुरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

परंपरा दर्शनाची....

ग्रामस्थांशी बोलताना श्री. मुश्रीफ म्हणाले, "मी सहा निवडणुकांपासून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आप्पाचीवाडीत येऊन हालसिद्धनाथाचे दर्शन घेतो. निकालाच्या दिवशी सकाळी निकालाचा कल स्पष्ट होताच, मी पुन्हा आप्पाचीवाडीचे दर्शन घेऊन जातो आणि त्यानंतर विजयी झाल्यानंतर हालसिद्धनाथाचे दर्शन घेऊन जातो.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT