आजरा (कोल्हापूर): जिल्ह्यात काही जण स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवत आहेत. ते आमच्यावर वाटेल तशी टीका करीत आहेत. त्यांनी दुसऱ्याच्या जेवणात माती कालवू नये. सयाजी हॉटेल कोणत्या आरक्षित जागेवर उभारले आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक बोलावे, अशी घणाघाती टीका आमदार सतेज पाटील यांचे नाव घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
आजरा शहर विकास आघाडीच्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते. माजी आमदार महादेवराव महाडिक अध्यक्षस्थानी होते. आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, गोकुळचे संचालक बाबा देसाई, रवींद्र आपटे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता रेडेकर, आजरा सूत गिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णादेवी चराटी प्रमुख उपस्थित होते. आघाडीचे प्रमुख व नगरसेवक अशोक चराटी यांनी प्रास्ताविक केले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, "अनेक वर्षे सत्तेत राहून जनतेला फसवून विरोधकांनी स्वतःची घरे भरली. यामुळे विरोधकांनी 2019 च्या निवडणुकीची तयारी न केलेली बरी. आजऱ्यात भाजपने चिन्ह घेतले नाही. याचा विरोधकांनी अपप्रचार केला. मी प्रचारला आलो नाही हा मुद्दाही प्रचाराचा बनवला, पण मी प्रचारला न आल्याने त्यांचे दोन पाच जण तरी निवडून आले. प्रत्येक निवडणुकीत आम्हाला यावयाची गरज नाही. आमचे प्रत्येक तालुक्यातील "अशोक' जिल्ह्यांच्या नेत्यांचा पराभव करायला सक्षम आहेत.''
सुरेश हाळवणकर म्हणाले, ""श्री. चराटी यांनी नगरपंचायतीसाठी 55 कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. या नगरपंचायतीला सरकारकडून विकास निधी पुरवला जाईल.''
श्री. महाडिक, आमदार हाळवणकर यांच्याहस्ते नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, नूतन नगरसेवक यांचा सत्कार झाला. प्रकाश चव्हाण, हेमंत कोलेकर, डॉ. अनिल देशपांडे, अरुण देसाई, डॉ. दीपक सातोस्कर, अजित चराटी, रमेश रेडेकर, प्रकाश बेलवाडे, गोपाळराव पाटील, प्रा. सुधीर मुंज, मलिककुमार बुरुड, आलम नाईकवाडे, संजय सावंत उपस्थित होते. विलास नाईक यांनी आभार मानले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.