kolhapur district cooperative bank earned profit of one hundred thirty crore
kolhapur district cooperative bank earned profit of one hundred thirty crore 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा बॅंकेला 130 कोटींचा विक्रमी नफा

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : नोटबंदी, महापूर आणि आता कोरोना यासारख्या संकटांवर मात करून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला यावर्षी संपलेल्या अर्थिक वर्षात विक्रमी तब्बल 130 कोटी 77 लाख 75 हजार रूपयांचा ढोबळ नफा झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील जिल्हा बॅंकेत नफ्याचा हा विक्रम असेल, असा दावा श्री. मुश्रीफ यांनी केला.

श्री. मुश्रीफ म्हणाले,"सहा वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दीनंतर 2015 मध्ये बॅंकेत संचालक मंडळ आले. त्याचवेळी बॅंकेला गतवैभव मिळवून देण्यासाठी काही कठोर भुमिका घेण्याचे आम्ही ठरवले होते. त्याला संचालक, कर्मचारी, अधिकारी आणि संस्थांनीही सहकार्य केले. नाबार्ड आणि राज्य शासनाने थकित कर्जाच्या वसुलीसाठी 'ओटीएस' योजनेला परवानगी दिल्याने बॅंकेचे काम सोपे झाले. तरीही पहिली दोन वर्षे संचित तोटा कमी करण्यासाठीच गेली. गेल्या तीन वर्षापासून मात्र बॅंकेला सातत्याने नफा होत आहे. पुढच्या अर्थिक वर्षात सात हजार कोटीच्या ठेवी, 200 कोटी ढोबळ तर 50 ते 70 कोटी निव्वळ नफा मिळवण्याचे उद्दीष्ट आहे.'

ते म्हणाले,"बॅंकेने ठरवलेल्या उद्दीष्टाला पहिल्यांदा नोटबंदीमुळे, गेल्यावर्षी महापुराने तर यावर्षी कोरोनाने अनेक संकटे उभी केली. यावर्षी सहा हजार कोटी ठेवी, शंभर कोटी नफा, नऊ टक्के बोनस आणि 12 टक्के लाभांश असे उद्दीष्ट ठेवले होते. त्यानुसार ठेवी फक्त 200 कोटींनी कमी पडल्या बाकी सर्व उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. अनेक संकटावर मात करत बॅंकेने यावर्षी अभूतपुर्व असे यश मिळवले आहे.'

यावेळी संचालक खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, भैय्या माने, आर. के. पोवार, अनिल पाटील, सर्जेराव
पाटील-पेरीडकर, आसिफ फरास, उदयानी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने आदि उपस्थित होते.

प्राप्तीकरापोटी 17 कोटी भरले
बॅंकेला झालेल्या एकूण ढोबळ नफ्यापैकी सुमारे 17 कोटी रूपये हे प्राप्तीकरापोटी भरावे लागले आहेत. एकूण निव्वळ नफ्यावर हा प्राप्तीकर भरावा लागतो. ढोबळ नफ्यातून इतर अनेक कारणांसाठी अर्थिक तरतूद केल्याने निव्वळ नफा कमी झाला, त्यामुळे प्राप्तीकर कमी भरावा लागला, असे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

मुख्यमंत्री निधीला 2 कोटी
कोरोना विरोधात राज्य सरकारने सुरू केलेल्या लढाईला सहकार्य म्हणून जिल्हा बॅंकेच्यावतीने 2 कोटी रूपये देण्यात येणार आहेत. बॅंकेला झालेल्या ढोबळ नफ्यातून ही तरतूद करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देऊन सोमवारी या रक्कमेचा धनादेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात येईल, असे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT