कोल्हापूर

संवाद सुरु आहे, भाजपा-सेना युती पुन्हा होईल: पूनम महाजन 

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : राज्य व केंद्र सरकारच्या कामाबद्दल लोकांतून नकारात्मक प्रतिक्रिया नसल्या तरी अजूनही सरकारकडून लोकांच्या अपेक्षा आहेत, असे भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, भाजपा-सेना युती पुन्हा होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्‍त केला. 

खासदार विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने व युवा मोर्चाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आजपासून पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना राज्यासह देशातील विविध प्रश्‍नाला हात घातला. 

त्या म्हणाल्या,"नोटबंदी, जीएसटी आदि निर्णयाने केंद्र सरकार "बॅकफुट' वर गेल्याचे मी केलेल्या दौऱ्यातील संवादात कोठे दिसले नाही. वाचनातून काही गोष्टी समोर आल्या, प्रत्यक्ष संवाद साधताना लोकांच्या अजूनही सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. लोकांकडून "फिडबॅक' चांगला येतो. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचल्या पाहीजेत, हे काम युवा मोर्चाकडून सुरू आहे. युवकांची जी स्वप्ने आहेत तीच देशाची आहेत, त्यामुळे युवकांत उत्साह पहायला मिळाला.' 

भाजपा-सेना युती दोन्हीकडून तोडली गेलेली नाही, घरात खटके उडत असतात, जास्त दिवस दोन्ही पक्ष एकत्र असल्याने असे खटके अपेक्षित आहेत, पण ते घटस्फोटापर्यंत पोहचले असले तरी पक्ष वाढत असताना हे होत रहाणार. दोघेही सरकारमध्ये आहेत, त्यांनी जबाबदारीने वागायला पाहीजे, युती करण्याबाबत संवाद सुरू आहे, अजून निवडणुकीला भरपूर वेळ आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींवर माझा पूर्ण विश्‍वास असल्याचे सांगत खासदार महाजन यांनी भाजपा-सेना युती पुन्हा होईल, असा आशावाद व्यक्त केला. 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव, "गोकुळ' संचालक बाबा देसाई, युवा मोर्चाचे राज्याध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, मधुकेशव देसाई, अमित कुमार, जिल्हाध्यक्ष अमरसिंह भोसले आदि उपस्थित होते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT