mahadeorao-mahadik
mahadeorao-mahadik 
कोल्हापूर

सगळ्यांना पुरून उरणारा महाडिक आहे!

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर: ''हत्ती चालत असतो आणि कुत्री भुंकत असतात, त्याकडे लक्ष द्यायचे नाही. सगळ्यांना पुरून उरणारा महाडिक आहे, अजूनही जिल्ह्याची ताकद माझ्याकडे आहे, हे विसरू नका,'' या शब्दांत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विरोधकांना आव्हान दिले.

भीमा कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन आज झाले. त्यावेळी  महादेवराव महाडिक म्हणाले,"जिल्ह्यात एवढे मोठे प्रदर्शन भरवणारा धनंजय महाडिक हा एकमेव आहे. गरीबीची जाण असणारा हा नेता आहे. अनेक अडचणी येऊनही त्यांनी कधी गरीबाशी असलेली आपली नाळ कधी तोडली नाही आणि तोडणारही नाही. त्यामुळे टिका करणाऱ्यांची दखल घेण्याची महाडिकांना गरज नाही.'

आपली उंची आपल्याला माहिती आहे, पण विरोधकांची उंची मोजू नका, ती तुमची चूक असेल, असे धनंजय महाडिक यांना उद्देशून महादेवराव महाडिक म्हणाले. ते म्हणाले, "हत्ती चालत असतो आणि कुत्री भुंकत असतात, त्याकडे लक्ष द्यायचे नाही. सगळ्यांना पुरून उरणारा महाडिक आहे, अजूनही जिल्ह्याची ताकद माझ्याकडे आहे, हे विसरू नका.'

माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले,"हे प्रदर्शन 13 वे आहे आणि 13 हा आकडा आम्हाला शुभ आहे, त्यामुळे कोणी कितीही अडथळे आणले तरी हे प्रदर्शन होणारच आहे. पण यातही राजकारण करणे योग्य नाही. शेती, सिंचन, पायाभूत सुविधा अशा कामात पक्षीय जोडे बाजूला ठेवले पाहीजेत. सकारात्मक कामात त्यांनी सहकार्य केले पाहीजे. खंडपीठासाठी आम्ही त्यांची केंद्रीय कायदा मंत्र्यांची भेट घालून द्यायला तयार आहोत. विकासाच्या कामात राजकारण असू नये.'

धनंजय महाडिक यांनी भाजपात यायला उशीर केला, पण त्यांच्यामुळे आमच्या पक्षाची ताकद वाढली आहे. त्यांच्यामुळे पक्षाला मोठे बॅनर तयार झाले. आमचे संघटन मजबूत होते पण मार्केटींगमध्ये आम्ही कमी पडत होतो. 2024 च्या निवडणुकीत महाडिकांचा हा पैरा फेडू आणि संसदेत पुन्हा एकदा कोल्हापुरचा आवाज घुमला पाहीजे यासाठी प्रयत्न करू, असे श्री. हाळवणकर यावेळी म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT