sharad_pawar_
sharad_pawar_ 
कोल्हापूर

महापूर, शरद पवार आणि लोकांना वाटणारा आधार !

निवास चौगले

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यावर ज्या ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती आली त्या त्यावेळी सत्तेत असो वा नसो राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे धावून आलेले आहेत. 1989, 2005 नंतर यावर्षी आलेल्या महापुरातही कोल्हापुरात येऊन पूरग्रस्तांची नुसती चौकशी केली नाही तर त्यांना आधार देण्याचे काम केले. 

वयाच्या 79 व्या वर्षी मोटारीने त्यांनी शिरोळ, कोल्हापुरला भेट देऊन या जिल्ह्यातील जनतेशी आपली नाळ अजूनही घट्ट जोडली असल्याचा संदेशच यातून दिला. श्री. पवार यांनी दोन दिवसांत ज्या ज्या ठिकाणी भेट दिली, त्याठिकाणी लोकांची गर्दी त्यांच्या भोवती कायम दिसली. 

जिल्ह्याला पहिल्यांदा महापुराचा तडाखा बसला तो 1989 ला. त्यावेळी श्री. पवार हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी तातडीने कोल्हापुरला धाव घेतली. अचानक आलेल्या पावसामुळे त्यावेळी 2005 पेक्षा भयानक परिस्थिती होती. तीन दिवस कोल्हापुरात मुक्काम ठोकून त्यांनी पूरग्रस्त भागातील लोकांना दिलासा दिला. कोल्हापूरहून बाहेर जाणारे सर्व रस्ते बंद होते, रेल्वेमार्ग फक्त सुरू होता, त्यामुळे चार दिवस थांबून 4 ऑगष्ट 1989 रोजी ते रेल्वेने मुंबईला रवाना झाले.

2005 साली तर 1989 पेक्षा जास्त महापूर आला होता. प्रशासनच काय पण पुराचा तडाखा बसलेल्या भागातील लोकही गाफील राहीले आणि बघता बघता संपूर्ण जिल्ह्याला महापुराचा विळखा पडला. त्यावेळी श्री. पवार हे केंद्रात कृषी खात्याचे मंत्री होते. त्यांनी तातडीने दिल्लीहून थेट कोल्हापुरला धाव घेतली. त्यावेळी राज्यात आणि केंद्रातही कॉंग्रेस आघाडीचे सरकार होते. दोन्हीकडील सरकारमध्ये श्री. पवार यांच्या शब्दाला महत्त्व होते, त्यातून लष्करासह वायुसेनेची तातडीने मदत मिळाली आणि पूरग्रस्तांना दिलासा मिळाला.

आता तब्बल 14 वर्षांनी पुन्हा जिल्ह्यावर महापुराचे संकट आले, पण सत्तेत नसतानाही श्री. पवार यांनी दोन दिवस तळ ठोकून इथल्या पूरग्रस्तांची भेट घेतली. त्यांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांच्या मागण्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. श्री. पवार आज सत्तेत नसले तरी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून अलमट्टीचा विसर्ग वाढवण्यास सांगितले आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणीही तातडीने झाली. त्यामुळे ज्या ज्यावेळी कोल्हापुरवर संकट आले त्या त्यावेळी श्री. पवार हे कोल्हापुरकरांना  आधारच वाटतात असे यावेळच्या दौऱ्यातही दिसून आले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT