कोल्हापूर

इचलकरंजी वर राष्ट्रवादीचा हक्क? काँग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट नाही

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर आतापासूनच राजकीय हालचाली गतिमान होत आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस आणि भाजप हे प्रबळ पारंपरिक राजकीय विरोधक आहेत. दोन विधानसभा निवडणुकीत या दोन राष्ट्रीय पातळीवरील पक्षातील उमेदवारांमध्येच तुल्यबळ लढत झाली. आता पुन्हा या मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची चर्चा रंगू लागली आहे.

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने हक्क सांगण्यास सुरवात केली आहे. संभाव्य उमेदवाराच्या नावाबाबत सोशल मीडियातून चर्चाही केली जात आहे. पण आपला पारंपरिक मतदारसंघ असलेल्या कॉंग्रेसने अद्याप याबाबत भूमिका जाहीर केलेली नाही. याबद्दल अनेक तर्क-वितर्क करण्यात येत असून, कॉंग्रेसच्या या उदासीन भूमिकेमुळे कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर आतापासूनच राजकीय हालचाली गतिमान होत आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस आणि भाजप हे प्रबळ पारंपरिक राजकीय विरोधक आहेत. दोन विधानसभा निवडणुकीत या दोन राष्ट्रीय पातळीवरील पक्षातील उमेदवारांमध्येच तुल्यबळ लढत झाली. आता पुन्हा या मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची चर्चा रंगू लागली आहे.

दुसरीकडे, प्रदेश पातळीवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी होणार असल्याचे जवळपास निश्‍चित आहे. पण राष्ट्रवादीने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाची मागणी केल्यामुळे राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चेला तोंड फुटले आहे. या मतदारसंघाची मागणी करताना नगरसेवकांची संख्या, कॉंग्रेसच्या उमेदवाराचा सलग दोन वेळा झालेला पराभव अशी विविध कारणे दिली गेली आहेत. पण कट्टरपणे गटा-तटात विभागलेल्या राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवार कोण असणार, याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. सोशल मीडियावर मात्र कार्यकर्ते इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत आणत आहेत.

एकीकडे राष्ट्रवादीत या हालचाली सुरू असताना दुसरीकडे कॉंग्रेसच्या गोटात मात्र शांतता असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेवर कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना कॉंग्रेसची उदासीन भूमिका कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकत आहे. नवीन पक्षाची करण्यात आलेली स्थापना आणखी गोंधळ निर्माण करणारी आहे.

मतदारसंघावर कॉंग्रेसचे प्राबल्य
या मतदारसंघात कॉंग्रेसचे प्राबल्य आहे. कॉंग्रेसचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे. आजही पालिकेत सर्वाधिक नगरसेवक कॉंग्रेस पक्षाचे आहेत. विविध प्रश्‍नांवर कॉंग्रेस आक्रमक राहिली आहे. अशी कॉंग्रेसची मतदारसंघातील राजकीय परिस्थिती असताना राष्ट्रवादीने या मतदारसंघाची मागणी केल्यामुळे अनेक तर्क-वितर्क करण्यात येत आहेत.

कॉंग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
कॉंग्रेस हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडणार काय, याची चर्चा होत आहे. कॉंग्रेसकडून अद्याप त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही; मात्र मतदारसंघ सोडण्याचा धक्कादायक निर्णय झाल्यास माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची पुढील राजकीय भूमिका काय असणार, याबाबत मोठी उत्सुकता असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT