Mahesh Kothe
Mahesh Kothe sarkarnama
कोल्हापूर

महेश कोठेंचा राष्ट्रवादीवर भरोसा नाय का?

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : प्रभाग जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीतील (Ncp) जुन्या शिलेदारांनी सोलापूर शहर राष्ट्रवादीमय करायला सुरुवात केली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसने शेवटच्या क्षणी आघाडीचा हात सोडल्यानंतर उमेदवार न मिळालेली राष्ट्रवादी आता 102 जागांची तयारी करु लागली आहे. जुन्या शिलेदारांना नव्या शिलेदारांची साथ मिळणे अपेक्षित असताना माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) यांनी भाजपच्या विरोधात लढण्यासाठी व्यक्त केलेल्या सर्वपक्षीय आघाडीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास ढासळण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीने ज्या अपेक्षेने कोठे यांना पक्षात घेतले तेच कोठे आता सर्वपक्षीय आघाडीची भाषा करु लागल्याने कोठेंचा राष्ट्रवादीवर भरोसा नाय का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. (NCP prepares for municipal elections in Solapur)

केंद्रात, राज्यात आणि सोलापूर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असताना या सत्तेच्या विरोधात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी सोलापुरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस तग धरुन ठेवली. राष्ट्रवादीचे आता काही खरे नाही म्हणून त्याकाळी शहर राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनी गुपचूपमध्ये शिवसेना अन्‌ भाजपच्या दारावर टकटक केल्याचीही चर्चा चांगलीच रंगली होती. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जो राजकीय करिष्मा दाखविला त्याची सुरुवातच सोलापुरातून झाली. तो मेळावा यशस्वी करुन दाखविणाऱ्या महत्वाच्या नेत्यांमध्ये भारत जाधव, संतोष पवार आणि जुबेर बागवान यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्रात आलेली सत्ता, सोलापूर राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक असलेले दिग्गज यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला अच्छे दिन येण्याची दाट शक्‍यता आहे.

महेश कोठे यांनी मांडलेला सर्वपक्षीय आघाडीचा प्रस्ताव यापूर्वीही महापौर निवडीत आणि विषय समिती सभापती निवडीतही समोर आला होता. भाजप विरोधकांमध्ये एकमत होत नाही हे त्याच वेळी सिध्दही झाले आहे. त्यामुळे कोठेंच्या मनातील सर्वपक्षीय आघाडी कागदोपत्री जरी भक्कम वाटत असली तरीही प्रत्यक्षात मात्र या आघाडीकडे विश्‍वासार्हता नसल्याचे दिसले आहे. कमी वेळेत कॉंग्रेस, शिवसेनामार्गे राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेण्यास निघालेल्या महेश कोठेंच्या करिअरसाठी महापालिकेची आगामी निवडणूक टर्निंग पॉईंट मानली जात आहे. सोलापुरात राष्ट्रवादीचा महापौर आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदारकी हे राष्ट्रवादीचे आणि कोठेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिकेची आगामी निवडणूक महत्वाची मानली जात आहे.

आमदार देशमुखांच्या शांततेत दडलयं काय?

सोलापूर महापालिकेवर जरी भाजपची सत्ता असली तरीही त्यामध्ये सिंहाचा वाटा हा माजीमंत्री तथा भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा आहे. महेश कोठे, तौफिक शेख, आनंद चंदनशिवे यांच्यासह अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादीला सोबत घेण्याची तयारी केली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीविरुध्द भाजप अशाच प्रमुख लढती बघायला मिळण्याची शक्‍यता आहे. महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी आमदार देशमुख कोणता राजकीय डाव खेळतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT