Kolhapur Politics  Sarkarnama
कोल्हापूर

Kolhapur Politics News : दक्षिणच्या राजकारणात दोघांत तिसरा? राजेश क्षीरसागरांनी टाकली गुगली...

Mangesh Mahale

राहुल गडकर

Kolhapur : आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आत्तापासूनच सुरू झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला मतदारसंघ चर्चेचा विषय बनला आहे. आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध आमदार अमल महाडिक यांच्यात सामना रंगत असतानाच त्यात आता राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी उडी घेतलेली आहे. त्यामुळे दक्षिणच्या राजकारणात दोघांत तिसरा...असे समीकरण बनते की काय? अशा चर्चेला ऊत आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप एक वर्षाचा कालावधी असला तरी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात निवडणूक लढवण्यावरून आत्तापासूनच खडाखडी सुरू झाली आहे. या दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार सतेज पाटील विरुद्ध महाडिक हे पारंपरिक प्रतिस्पर्धी असतानाच आता राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीदेखील शड्डू ठोकला आहे.

क्षीरसागर यांनी दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. उत्तर विधानसभा हा त्यांचा घरचा मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 ला दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी त्यांचा पराभव केला. मिशन उत्तर, दक्षिण म्हणून त्यांनी दोन्ही मतदार कार्यक्रमांचा धडाका लावला आहे.

माझी लोकप्रियता जिल्हाभर असून, कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. असे सांगत त्यांनी विधानसभा निवडणुकीला सर्वतोपरी सज्ज असल्याचं दाखवून दिले आहे. पक्ष जिथून सांगेल तिथून मी निवडणूक लढवणार, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असल्याची कबुली दिली आहे.

दुसरीकडे याआधी अमल महाडिक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल आहे. त्यांच्या विजयासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी निवडणुकीच्या आधीच रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या विजयासाठी तेदेखील सर्वतोपरी सज्ज आहेत. भाजपच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात विकासकामे केली आहेत. त्यामुळे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून अमल महाडिकच निवडणूक लढवतील आणि ते निवडूनसुद्धा येतील, असा विश्वास धनंजय महाडिक यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे.

या सगळ्या संदर्भात विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांनी मात्र सध्यातरी मौन बाळगले आहे. पण 2019 च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आमदार पाटील यांना डिवचले आहे. दक्षिणचे आमदार कोण कसा होतो पाहूच, असं म्हणत त्यांनी यापूर्वी पाटील गटाला आव्हान दिले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाडिक पाटील यांच्याबरोबर क्षीरसागर मैदानात असतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

क्षीरसागर यांची गुगली?

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट एकत्र निवडणूक लढल्यास कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्तापासूनच क्षीरसागर यांनी दक्षिणमध्ये बीज रोवण्याला सुरुवात केली आहे. पण वास्तविक पाहता 2019 च्या निवडणुकीत पाटील गटामुळे पराभव झाला, असा समज क्षीरसागर यांना आहे. त्यामुळे दक्षिणच्या राजकारणाबाबत क्षीरसागर यांची ही गुगली असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ते उत्तरमधूनच निवडणूक लढवतील, असे जाणकारांचे मत आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT