Raju-Shetty-Jayant-Patil
Raju-Shetty-Jayant-Patil 
कोल्हापूर

राजकीय समीकरणे बदलू लागली : राजू शेट्टी यांनी राजारामबापू दुध संघात सत्कार स्वीकारला !

शांताराम पाटील .

इस्लामपुर : सांगली जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलू लागली आहेत . एक वेळेस सूर्य पश्चिमेस उगवेल पण राजू शेट्टी आणि जयंत पाटील कधीही एकत्र येणार नाहीत असे जिल्ह्यातील राजकीय निरीक्षक छाती ठोकून सांगत असत . पण खासदार  राजू शेट्टी यांनी आज चक्क जयंत पाटील यांच्या  राजारामबापू दुध संघात सत्कार स्वीकारला !

एकेकाळी साखर सम्राटांविरुद्ध धडाडणारी स्वाभिमानी शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ आज साखर सम्राटांशी हस्तांदोलन करीत आहे , ही भाजपमधील चाणक्यांच्या अपयशी विस्तारवादी राजकारणाची फलनिष्पत्तीच मानावी  लागेल . 

ज्यांच्या दिवसाची सुरवात जयंत पाटील यांच्या राजकीय  व सहकारी संस्थांची मापे काढल्याशिवाय झाली नाही असे राजकारणातील पक्के वैरी एकत्र आले आहेत .  गेल्या काही वर्षापासुन एकमेकाना पाण्यात बघणारे जयंत पाटील व राजु शेट्टी हे पश्चिम महाराष्ट्रातील राजकिय पटलावरील प्रमुख नेते . मात्र आज वाळवा तालुक्यातील लोकाना एक वेगळेच चित्र पहावयास मिळाले .

जयंत पाटील  यांचे कट्टर विरोधक मानले गेलेले राजू शेट्टी  आज जयंत पाटील यांच्या राजारामबापू दुध संघात गेले . गाडी  चुकुन आत गेली काय ? असा प्रश्न पडावा इतका हा विरोधाभासी प्रसंग होता .  मात्र , खासदार शेट्टी यानी राजारामबापु दुध संघात जावुन संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या हस्ते सत्कार स्विकारला . या घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

मात्र राजकारणात कोण कुणाचा कायमचा शत्रु अथवा मित्र नसतो  याचा अनुभव आला . आता या भेटीची कारणे अनेक दिली जातील . मतदाराना सांगायला, मात्र इस्लामपुर विधानसभा मतदार संघ व हातकणंगले लोकसभा मतदार संघातील  भविष्यातील राजकारण काय असेल याचा ट्रेलर या घटनेमधुन स्वच्छ दिसतो .

खासदार राजू शेट्टी यांनी भाजपची सांगत पूर्णपणे सोडली आहे हे अलीकडच्या काही दिवसातील घटना घडामोडी पाहता  स्पष्ट होते . मुंबईत भाजप विरोधात 'संविधान बचाव 'च्या निमित्ताने देशातील प्रमुख विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या कामात खासदार राजू शेट्टी यांचा सहभाग तर होताच पण पुढाकार देखील होता .

 खुद्द शरद पवार यांनीच यावर शिक्कामोर्तब करताना राजू शेट्टी आणि जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला होता हे जाहीरपणे सांगितले आहे . त्यानंतर गेल्या आठवड्यात शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्यात प्रदीर्घ राजकीय चर्चाही झाली . राजू शेट्टी यांच्या अलीकडच्या काळातील राजकीय हालचाली पाहता ते आता भाजपापासून बरेच दूर गेलेले दिसतात .

भाजपच्या चाणक्यांनी सदाभाऊ खोत यांना राजू शेट्टी यांच्यापासून आधी मंत्रिपदाच्या निमित्ताने फोडले . त्यानंतर सदाभाऊ खोत यांना शेतकरी नेता म्हणून  राजू शेट्टी यांच्या विरोधात प्रोजेक्शन देण्याचा प्रयत्न केला . त्यामुळे चवताळले राजू शेट्टी उसळी मारून वर आले असून त्यांनी  संघटनात्मक बळ  आणि आपली प्रतिमा अधिक उंचावण्याचे काम सुरु केले आहे .

त्यामुळे राजकारणातील एकेकाळचे परस्परांचे कट्टर विरोधक असलेले नेते आता जिवलग मित्र बनू लागले आहेत तर सख्खे मित्र केंव्हाच पक्के वैरी बनले आहेत . राजू शेट्टी यांची  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षबरॊबर वाढत चाललेली जवळीक कोल्हापूर, सांगली, सातारा , सोलापूर ,पुणे ग्रामीण या साखर पट्ट्यात भाजपाला सेट बॅक देणारी तर राष्ट्रवादीचे बाळ वाढविणारी ठरणार आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT