Satej Patil Answers Dhanjay Mahadik's Allegations
Satej Patil Answers Dhanjay Mahadik's Allegations 
कोल्हापूर

पालककमंत्री बदलणे म्हणजे पंपावरचा माणूस बदलणे नव्हे; सतेज पाटील यांचे महाडिकांना प्रत्युत्तर

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : पालकमंत्री बदलायचा म्हणजे काय पंपावरचा माणूस बदलायचा आहे का? असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांना लगावला. कोरोनाच्या काळात मी किती सक्रिय होतो आणि महाडिक किती आहेत ते जनतेने पाहिले आहे. तुम्ही सक्रिय होता म्हणूनच तुम्हाला जनतेने पावणे तीन लाख मतांनी निष्क्रिय केले आहे. ज्यांचा स्वतःचा कारखाना कर्जबाजारी आहे ते भाजपचे साखर तज्ज्ञ आहेत. असे आरोपही मंत्री पाटील यांनी महाडिकांवर केले. शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

माजी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री निष्क्रिय आहेत. त्यांना बदला आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री करा अशी मागणी केली होती. यावर प्रत्युत्तर देताना मंत्री सतेज पाटील म्हणाले, "युथ कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक पॅकेजचे काय झाले याची विचारणा करण्यासाठी त्यांच्या घरासमोर आंदोलन केले. कारण त्यांना आठवण करून द्यायची होती की तुम्ही भाजपचे नेते आहात. सर्वच पक्षात आपल्याबद्दल सहानभुती बाळगणारे लोक आहेत असे त्यांना अत्तापर्यंत वाटत होते. मात्र युथ कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोरच आंदोलन केल्याने त्यांच्या परतीचे दोर कापले गेले. याचा राग त्यांना आला. अन्यथा अशा राजकीय आंदोलनांवर संतप्त होण्याचे काही कारण नव्हते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोरही आंदोलन झाले पण त्यांनी एका शब्दानेही त्याला उत्तर दिले नाही. त्यांना जी राजकीय समज आहे ती महाडिक यांना नाही,''

पालकमंत्र्यांच्या सक्रियतेविषयी पाटील म्हणाले, "महाडिक सक्रिय होते म्हणून कोल्हापुरच्या जनतेने त्यांना पावणे तीन लाख मतांनी निष्क्रिय केले. कोरोनाच्या पाच महिन्यांच्या काळात ते किती सक्रिय होते आणि मी किती सक्रिय आहे हे जनतेने पाहीले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष केले. ते किती सक्रिय आहेत हे लक्षात आल्यावर त्यांना उपाध्यक्ष पदावरून कमी करून कार्यकारणीत घेतले. पक्षाने त्यांना साखर कारखान्यांचे तज्ज्ञ म्हणून कारखान्यांचे प्रश्‍न मांडण्याचे काम दिले आहे. पण त्यांचा स्वतःचा साखर कारखाना कर्जबाजारी आहे. तीन वर्ष कारखाना बंद आहे. ३०० कोटीचे कर्ज आहे. कामगारांचे पगार दिलेले नाहीत. तेथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याने साखर आयुक्तांकडे याबाबत तक्रार केल्याने त्यांची साखर जप्त झाली. ते आता भाजपचे साखरेचे धोरण मांडणार आहेत. खासदारकी जावून वर्ष झाले नाही तरी दिल्लीतला बंगला त्यांनी सोडलेला नाही. माझ्यावर टिका केली की प्रसिद्धी मिळते हे त्यांना माहिती असल्याने ते टिका करतात."

मुश्रीफांच्या स्तुतीचा आनंद
हसन मुश्रीफ यांच्या कामाचे महाडिक यांनी कौतुक केल्याचा आनंद आहे. कारण आम्ही दोघेही महाविकास आघाडी म्हणून काम करतो. त्यांचे कौतुक करणे म्हणजे महाविसाक आघाडीचे कौतुक करण्यासारखे आहे. महाडिक यांनी मुश्रीफ आणि माझ्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करू नये ते त्यांना जमणार नाही, असेही ते म्हणाले.
Edited BY - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT