धुळगाव तालुका येवला येथे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने सुरुवात केली मागील अतिवृष्टी झालेल्या पावसाचे अनुदानाच्या प्रतीक्षेत असताना आज पुन्हा पावसाने जोरदार बॅटिंगला सुरुवात केली. यामुळं काढणीला आलेला मका, सोयाबीन पूर्णतः ओला झाला. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मका काढून ठेवला होता, त्या मक्याची कणसं एका शेतातून दुसऱ्या शेतात वाहून गेले. हे सर्व पाहताना शेतकरी एकमेकांकडे बघत होते. शेतामध्ये होता नव्हता तो मका तरी हाताशी लागेल या आशेनं शेतकऱ्यानं तो कापून ठेवला होता. पण परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पूर्णता दानादान झाल्याचे आज दिसून आले. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेला शेतकरी वर्ग मात्र पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि शहराची बैठक घेतल्याची माहिती मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी, सोलापूरमध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला असून पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना अजित दादा आणि सुनील तटकरे यांच्या पर्यंत पोहोचवणार आहे. आम्ही एकत्रित महायुतीत आहोत त्यामुळे एकत्रित निवडणुका लढवायची इच्छा आहे. आमची 102 जागांवरती लढवण्यासाठी चाचपणी सुरू असल्याचेही भरणे यांनी म्हटले आहे.
आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमीवर उबाठा खासदार संजय राऊत यांची होणाऱ्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नसून महायुती मजबूत आहे. तर राज्यात पुढची २५ वर्षे महायुती सत्तेत राहणार असा दावा आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (दि.21) अर्धनग्न आंदोलन केले. हे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर केले. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात चटणी भाकरी खावून सरकारचा निषेध नोंदविला.
आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. तर मंत्री नितेश राणे यांनी देखील एकला चलो म्हणत तसे संकेत दिले आहेत. यावर आमदार दीपक केसरकर यांनी युती राहणार की नाही याबाबतचे निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतले जातात. त्यामुळे अशी कोणतीही स्टेटमेंट करणे योग्य नाही. निवडणूक एकत्र लढवावी यासाठी आमची भूमिका असेल. पण चर्चा न करता स्थानिक पातळीवर भाजपचा असा काही निर्णय झाला असेल तर आपल्यालाही (शिवसेनेला) तयारी करणे सोपे जाईल, असे म्हटलं आहे.
हॉटेल ऑरा बार गोळीबारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे याच्यावर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून खुटवडनगर येथील एक बंगला बळकावून खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. या प्रकरणात आता अंबड पोलिसांनी लोंढे पिता-पुत्राला ताब्यात घेतलं आहे. यामुळे लोंढे पिता-पुत्राची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे.
संजय राऊत हे नेहमीच टीकात्मक बोलत असतात. त्या टीकेतून महायुतीचे कधीच वाईट होत नाही. उलट आतापर्यंत चांगलेच होत आले आहे. आमची महायुती मजबूत असून त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी महायुतीत गैरसमज निर्माण होणार नाही. उलट ती अधिक भक्कम राहील, अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर दिली आहे. तसेच महायुती पाच वर्षे चांगला कारभार करेल आणि पुढील २५ वर्षे सत्तेत राहील, असाही दावा त्यांनी केला आहे.
चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. राजीव देशमुख यांनी 2009 ते 2014 या कालावधीत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. तर त्याआधी चाळीसगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते.
हिंदू-मुस्लिम, असा वाद सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी, निवडणूक डोळ्या समोर ठेवून मुस्लिम समाजाला बरोबरच, अल्पसंख्याक समाजाला जवळ करण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
काँग्रेस माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशावरून सोलापूर जिल्ह्यातील भाजपमध्ये राजकीय वादंग वाढला आहे. यातचदक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी या प्रवेशाबाबत 'पक्षाने आम्हाला कोणतीच कल्पना दिली नाही', असे म्हणत या निर्णयामुळे पक्षाला मोठी हानी होऊ शकते, असे म्हटले आहे.
भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाचे समर्थन केले आहे. भाजपच्या काही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी केलेले आंदोलन हे, स्पॉन्सर होते, त्याचा जाहीर निषेध करतो, असे राजेश काळे यांनी म्हटले. आंदोलन करणाऱ्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी. दिलीप माने हे सहकारातील मोठे नेते, असून त्यांचा पक्षप्रवेश लवकर झाला पाहिजे, असे राजेश काळे यांनी म्हटले आहे.
अकोल्यातल्या गांधी रोडवर रविकांत तुपकर यांच्या शेतकरी संघटनेने आज 'काळी दिवाळी' साजरी केली. शेतकरी शेतमाल पिकवणार, पण भाव नाही ठरू शकणार, असे फलक अंगावर धारण करत रविकांत तुपकर यांच्या शेतकरी संघटनेने आंदोलन करत सरकारचा निषेध केला.
राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या 'ऑपरेशन लोटस'ला ब्रेक लावण्यासाठी राष्ट्रवादीचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा आज सोलापूर दौरा झाला. यावेळी त्यांनी पक्ष सोडण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या माजी आमदारांना अजित पवारांनी केलेल्या मदतीची आठवण करून दिली. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मोठी मदत केली, असा दावा मंत्री भरणे यांनी केला.
दक्षिण सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करण्यात आला आहे. सुभाष देशमुख समर्थकांनी भाजप कार्यालयासमोर काळी टोपी परिधान करून यासाठी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात दिलीप माने यांचे नाव न घेता, “भ्रष्टाचारी आणि कलंकित माजी आमदाराला प्रवेश नको” अशा घोषणा देण्यात आल्या.
'आम्ही महायुती एकत्र येऊन, दुसऱ्यांशी लढायचं ठरवलेलं आहे. विरोधकांशी आपण लढूया. याचे महायुतीतील प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी भान ठेवले पाहिजे. एकमेकांचे नगरसेवक फोडण्याची जी प्रथा सुरू आहे, ती ठाण्यात चुकीची आहे,' अशी आगपाखड एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
महायुती ही विरोधकांना संपवण्याकरता तयार झालेली आहे. काँग्रेस असेल, किंवा हिंदुत्वाचे विचार ज्यांनी सोडले त्यांचा पराभव करण्यासाठी तयार झाली आहे, असे मत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं.
अमरावती जवळच्या नया अकोलामध्ये दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांचे एक दिवस अन्नत्याग आंदोलन केले. पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल असून, अजूनही सरकारी मदत मिळाली नसल्याने ही काळी दिवाळी साजरी करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हेक्टरी 50 हजार रुपये मदत आणि सातबारा कोरा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी थोरात सहकारी साखर कारखान्यात कुटुंबियांसमवेत लक्ष्मीपूजन केले. त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसह पाठबळ द्यावे, असे सांगितले. थोरातांनी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे आणि निवडणूक आयोग अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बनवाबनवीचा कार्यक्रम चालवला जात असल्याची टीका केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित केल्याची आणि प्रशासनिक पद्धतीत सुधारणा होण्याची गरज असल्याचेही अधोरेखित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत व प्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित यांनी देखील पोलीस स्मृतिस्तंभाजवळ जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेश वाचनातून गेल्या वर्षभरात देशात हौतात्म्य प्राप्त झालेल्या ३४ पोलीस अधिकारी व १५७ पोलीस अंमलदार अशा एकूण १९१ वीर शहीदांना त्यांच्या अतुलनीय बलिदानाबद्दल श्रद्धांजली वाहिली.
दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा देत एक भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी जिथे देशभरातील जनतेला सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या, तिथेच काही खास आवाहनही केलं आहे. पंतप्रधानांनी स्वदेशी वस्तूंचा स्वीकार, योग आणि आरोग्य यांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. तसेच त्यांनी ऑपरेशन सिंदूर पासून नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स पर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांचा उल्लेख केला.
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने पॅकेज जाहीर केले असले तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचलीच नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांची दिवाळी सरकारी मदतीशिवायच सुरू आहे. याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आले.
लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक त्रुटी आढळून येत असतानाच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य सरकारमधील तब्बल २४०० पुरूष कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्यावर सरकारकडून कारवाई केली जाणार असल्याचे समजते.
मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रातील बनावट शास्त्रज्ञ अख्तर हुसेन अहमद याच्या ठिकाणांवर तपास यंत्रणांकडून छापेमारी करण्यात आली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. छापेमारीमध्ये काही संवेदनशील माहिती यंत्रणांच्या हाती लागल्याचे समजते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पोलीस संशोधन केंद्र येथे आजच्या ‘पोलीस स्मृतिदिना’निमित्त देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर पोलीस जवानांना पुष्पचक्र अर्पण केलं. त्यांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाला ‘जनरल सॅल्यूट’ देत भावपूर्ण आदरांजली वाहिली. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील हॉटस्प्रिंग येथे चीनच्या हल्ल्याचा शौर्यानं प्रतिकार करत सी.आर.पी.एफ.च्या १० जवानांनी वीरमरण पत्करलं. त्यांच्या या अद्वितीय शौर्यस्मरणार्थ दरवर्षी हा दिवस ‘पोलीस स्मृतिदिन’ म्हणून साजरा केला जातो.
मुंबईच्या हवेची गुणवत्ता सोमवारी अत्यंत खराब असल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबई हे जगातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर बनले आहे. शहर आणि उपनगरांत अनिर्बंध फटाके फोडले गेल्याने प्रदूषणाच्या पातळीत विक्रमी वाढ झाली. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 334 अंकांवर गेला, तर संपूर्ण शहराचा एक्यूआय १८७ नोंद झाला.
पुण्यातील जैन समाजाच्या जागा वाद प्रकरणी धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांची हकालपट्टी करा, अशी मागणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
नवी मुंबई: वाशी येथील घराला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. रहेजा कॉम्प्लेक्समध्ये 14व्या मजल्यावरील एका सदनिकेला ही आग लागली होती. त्यानंतर ही आग बाजूच्या सदनिकेतही पसरली. या आगीत तीन सदनिकांचं नुकसान झाले आहे.
चाळीसगाव (जि, जळगाव) येथे मध्यरात्री दोन गटात हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. कट का मारला, यावरुन हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहेे. आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.