State Minister Abdul Sattar
State Minister Abdul Sattar Sarkarnama
महाराष्ट्र

Abdul Sattar: मलिक, देशमुखांचे मतदान नसले तरी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणारच..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कोर्टाच्या आदेशामुळे अनिल देशमुख, नवाब मलिक यांना राज्यसभेसाठी मतदान करता येणार नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) अडचण वाढली असा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. परंतु शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी, काॅंग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाण्याइतके मतदान आघाडीकडे आहे. (Shivsena) काही अपक्षांची देखील आम्हाला साथ मिळणार आहे. त्यामुळे विरोधकांनी फार खूष होण्याची गरज नाही. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निश्चित विजयी होतील, असा दावा महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला आहे.

भाजपकडे संख्याबळ नसतांना त्यांनी तीस उमेदवार देत राज्यभेची निवडणूक लादली. विधान परिषदेत देखील संख्याबळ नसतांना त्यांनी अतिरिक्त उमेदवार देत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु राज्यसभा आणि विधान परिषदेत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतीलच, असा विश्वास देखील सत्तार यांनी व्यक्त केला.

मुंबईत बोलतांना सत्तार यांनी राष्ट्रवादीचे नवाब मालिक, अनिल देशमुख या दोन माजी मंत्र्यांना न्यायालयाने मतदानाचा अधिकार नाकारल्याच्या निर्णयावर भाष्य केले. सत्तार म्हणाले, या संदर्भात आज सायंकाळी होणाऱ्या शिबीरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे योग्य ते निर्णय घेतील. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर महाविकास आघाडीचे नेते निश्चितच मार्ग काढतील.

पण आमची दोन मतं कमी झाल्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. राज्यसभेचे सहा उमेदवार निवडून येतील असे मतांचे सख्याबळ शिवसेना-राष्ट्रवादी-काॅंग्रेस आणि भाजपकडे होते. शिवसेनेचे दोन, भाजपचे दोन आणि राष्ट्रवादी, काॅंग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी होणार होते. परंतु भाजपने तिसरा उमेदवार देत ही निवडणूक लादली.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी देखील भाजपने संख्याबळ नसतांना अतिरिक्त उमेदवार दिले आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीने सगळी तयारी केली आहे. राहिला प्रश्न न्यायालयाच्या निकालाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा तर त्यावर आमचे नेते निश्चितच तोडगा काढतील. राज्यसभेवर महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार विजयी होऊन जातील, याचा पुनरुच्चार देखील सत्तार यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT