Abhijeet Dipke  Sarkarnama
महाराष्ट्र

Abhijeet Dipke grandmother death : आजीचे निधन, अभिजीत दिपके गावी रवाना; CJP आंदोलनाबाबत मोठा निर्धार

After his grandmother death, CJP founder Abhijeet Dipke heads home, while colleagues prepare to announce the movement next steps : दिल्ली न्यायालयाकडून अटी-शर्तींवर सुटका झाल्यानंतर कपिल सिब्बल यांची भेट; कुटुंबीयांसोबत राहण्यासाठी दिपके मूळ गावी रवाना, सौरव दास आणि आशुतोष रांका आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करणार.

Pradeep Pendhare

Abhijeet Dipke latest news : कॉकरोच जनता पार्टी (CJP) या उपहासात्मक आंदोलनाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई दिपके (वय 85) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. अभिजीत दिपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असतानाच त्यांच्या कुटुंबावर हा दुःखद प्रसंग ओढवला.

रविवारी (11 ऑक्टोबर) दिल्ली न्यायालयाने अटी-शर्तींवर सुटका केल्यानंतर दिपके यांनी ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर कुटुंबीयांसोबत राहण्यासाठी ते आपल्या गावी रवाना झाले. मात्र, या काळातही आंदोलन थांबणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी त्याची जबाबदारी सहकाऱ्यांवर सोपवली आहे.

अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करून आपल्या गावी परत जात असल्याची माहिती दिली. कुटुंबावर दुःखाचा प्रसंग कोसळला असून, अशा वेळी कुटुंबीयांसोबत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिपके यांच्या पोस्टनुसार, सौरव दास आणि आशुतोष रांका (आशू) हे लवकरच दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार आहेत. त्यामुळे दिपके गावी परतले असले, तरी CJPचे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

CJP माघार घेणार नाही आणि कोणत्याही दबावाला घाबरणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. तसेच, 10 ऑक्टोबर हा दिवस हुकुमशाहीच्या अंताची सुरुवात म्हणून इतिहासात नोंदवला जाईल, असा दावाही त्यांनी केला.

अभिजीत यांच्या आईला दिल्ली पोलिसांवर संशय

अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई दिपके यांचे हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या मूळ गावी शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती समोर आली आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. अभिजीत दिपके अलीकडेच हिंगोली येथे आले असताना त्यांनी गावी जाऊन आजीची भेट घेतली होती. दरम्यान, अभिजीत यांच्या आईने दिल्ली पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला होता.

दिल्ली पोलिसांनी घेतले होते ताब्यात

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी अभिजीत दिपके मुंबईहून दिल्लीला गेले होते. मात्र, दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असलेले सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली.

दास अन् रांका पत्रकार परिषद घेणार

या तिघांना रविवारी दिल्ली कॅन्टोन्मेंट येथील एसईएम न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना अटी-शर्तींवर सुटका मंजूर केली. सुटकेनंतर अभिजीत दिपके यांनी ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यानंतर कुटुंबीयांसोबत राहण्यासाठी गावी परतण्याचा निर्णय जाहीर केला. सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या प्रस्तावित पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT