बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईतील बससेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. वडाळा डेपोत आंदोलन आणि कर्मचाऱ्यांची भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बसफेऱ्या रद्द झाल्याने अनेक बसस्टॉपवर प्रवाशांची गर्दी वाढली असून मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे.
उद्धव ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले. इतर खासदार पक्ष सोडून गेले तरी वाजे मात्र ठाकरेंसोबत कायम असल्याने ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप आमदार-खासदारांची बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आमदारांचे रिपोर्ट कार्ड मांडणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार प्रसाद लाड मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता अंतरवाली सराटीत जाऊन लाड जरांगेंना भेटणार आहेत.
नागेश पाटील आष्टीकर यांनीही निष्ठा बदलल्याने शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. या टीकेला नागेश आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा आष्टीकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुषमा अंधारे यांच्या आरोपांना उत्तर द्यायला मी बांधील नाही. सुषमा अंधारे यांनी तर पार आमच्या खानदानीचा उद्धार केला, हे ऐकून मला खूप वाईट वाटले. वडील एका पक्षात आणि पुत्र दुसऱ्या पक्षात, हे समीकरण काही नवीन नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गजानन कीर्तिकर आहे, तर अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. अजून माझे वडील तिकडे गेलेत का? यांना कसली घाई आहे हेच मला कळत नाही. सुषमा अंधारे पुण्यात बसून गणित मांडत आहेत. अशा नेत्यांमुळेच त्यांना वीट आला असावा. आमच्यावर व्यक्त होण्याचं काही कारण नव्हते, असे कृष्णा पाटील आष्टीकरांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा फ्रान्स आणि स्लोव्हाकियाचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक दौरा यशस्वीरित्या आटोपला असून, ते फ्रान्सची राजधानी पॅरिस येथून मायदेशी रवाना झाले आहेत. हा दौरा भागीदारी आणि फलनिष्पत्ती या दोन्ही दृष्टीने ऐतिहासिक ठरल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात त्यांनी पॅरिसमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले. "गेल्या 12 वर्षांत भारताचा जीडीपी दुप्पट झाला असून, एक विश्वासार्ह भागीदार म्हणून जागतिक पटलावर भारताचा उदय होत आहे. जागतिक व्यवस्था तेव्हाच प्रभावी ठरेल, जेव्हा ती सर्वसमावेशक असेल," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदे शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’चे जाळे मुंबई महापालिकेतील शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांवर फेकण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेतील एकनाथ शिंदे शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी तर ‘शिवसेना उद्धव पक्षाचे किमान 25 नगरसेवक आमच्या संपर्कात असून, नजीकच्या काळात ही संख्या 50 पर्यंत पोहोचेल,’ असा दावा केला. त्याचबरोबर मनसेचे आणि आमचे मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे त्यांचे नगरसेवक आमच्या पक्षात आणण्याचा प्रयत्न नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला.
शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन आणि शिवसेना उद्धव पक्षाचे काही खासदार एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याने मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या हेतूने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासह आवश्यक त्या उपाययोजना करत, विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश विशेष शाखेने सर्व पोलिस उपायुक्ताना दिले आहे. विशेष शाखेकडून यासंदर्भात पत्र जारी करण्यात आलं आहे.
रेल्वेतील एका कर्मचाऱ्याने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमावलेली दोन कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. पश्चिम रेल्वेमध्ये नोकरीस असलेल्या प्रशांत बलदेवभाई रबारी याच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जानेवारी 2017 ते फेब्रुवारी 2021 या काळात रबारीने स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे 2.58 कोटी रुपयांची मालमत्ता जमा केल्याचा ठपका ‘ईडी’ने ठेवला आहे. रेल्वेमध्ये लोको पायलट आणि गार्ड यांचे साहित्य चढवण्याचे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याच्या भ्रष्टाचाराने खळबळ माजली आहे.
राज्यातील कर्जबाजारी शेतकर्यांना कर्जमुक्तीचा लाभ अधिक पारदर्शक, प्रभावी आणि सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६च्या अमंलबजावणीचा नियमित आढावा घेऊन, आवश्यक त्या सुधारणा सुचविणार आहे.
तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाचे नेते ऋतुब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेता म्हणून पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष रथींद्र बोस यांनी दिलेल्या मान्यतेला अंतरिम स्थगिती देण्यास कलकत्ता उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी विधान सभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘तृणमूल’चे नेते शेभनदेव चट्टोपाध्याय यांचे नाव दिले होते. मात्र विधासभाध्यक्षांनी ते फेटाळून ऋतुब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता दिली होती. त्याविरोधात चट्टोपाध्याय यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मेघालयमध्ये उद्या, शनिवारपासून (ता. 20) मतदारयादीची विशेष सखोल फेरपडताळणी (SIR) मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बी. डी. आर. तिवारी यांनी दिली. या मोहिमेअंतर्गत सात ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल. 20 ते 29 जून या कालावधीत पूर्वतयारी करण्यात येईल, तर 30 जून ते 29 जुलै दरम्यान प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी केली जाईल. पाच ऑगस्ट रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.