Mumbai News: राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण दुर्घटनेत दुर्दैवी निधन झालं होतं. अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी येत असतानाच बारामती विमानतळ धावपट्टीवर विमान उतरत असताना पायलटचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला होता. या भीषण अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबाबत अनेक गंभीर आरोप केले जात आहे. पण आता याचदरम्यान, एक सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी चौकशीसंबंधी लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी 6 मार्च रोजीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अजितदादांच्या मृत्यूप्रकऱणाच्या चौकशीसंबंधीचं पत्र पाठवल्याचं समोर आलं आहे.
या संदर्भात कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीसाठी पत्र न गेल्याचा आरोप केला आहे. पण आता मुख्यमंत्री फडणवीसांकडून शाह यांच्यात पत्रव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या पत्रात रोहित पवार यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघाताची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिल्याचं समोर आलं आहे. या पत्राद्वारे फडणवीसांनी अजित पवार यांच्या अपघातावर संशय व्यक्त केला जात असल्यानं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीनुसार या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी विनंती केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रासोबत रोहित पवार यांचं सीबीआय चौकशीच्या मागणीचं पत्र जोडल्याचंही समोर आलं आहे.
महत्त्वाची बाब रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा यांची भेट घेतली होती. यानंतर पहिल्यांदाच संसदेत अजितदादांचा अपघाताचा मुद्दा मांडण्यात आला. दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा सोमवारी(ता.16) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार प्रा. मनोज कुमार झा यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान अपघाताचा मुद्दा मांडत महत्वपूर्ण मागणी केली आहे.
झा यांनी संसदेत देशातील अहमदाबाद–लंडन विमान अपघात, अजित पवार विमान अपघात अशा काही दुर्घटना घडल्याचं नमूद केलं होतं. या सर्व प्रकरणांभोवती संशयाचं गूढ निर्माण झालं असून पायलट्स असोसिएशनने या संपूर्ण प्रकरणांची एका विशिष्ट Schedule (नियम) द्वारे सखोल चौकशी करावी, अशी मागणी झा यांनी राज्यसभेत केली होती. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनीही झा यांच्या प्रश्नावर उत्तर दिले होते.
केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी याबाबत आंतराष्ट्रीय निकष आणि प्रोटोकॉलनुसारच चौकशी सुरू असल्याचे उत्तर दिले. AAIB च्या लॅबमध्येच अपघाताचा सर्व डेटा रिकव्हर केला जात असून ही यंत्रणा अधिक सक्षम केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डी पोलिसांकडे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी तक्रार दिली आहे. शिर्डी विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारतींकडे तक्रारीचं निवेदन देत, कारवाईची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी सुधीर रावसाहेब म्हस्के यांनी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.शिर्डी पोलिसांनी तक्रारीचं निवेदन घेत, पुढील चौकशीसाठी बारामती पोलिसांकडे वर्ग केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.