Rohit Pawar Ajit Pawar .jpg sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Pawar News: अजितदादांचा अपघात नव्हे, घातच..! रोहित पवारांचे महाराष्ट्राचं राजकारण हादरवणारे ते सर्वात मोठे 10 दावे कोणते?

Rohit Pawar Press Conference : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर 13 दिवसांनी पत्रकार परिषद घेत आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवारांच्या अकाली अपघाती मृत्यूनं महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या निधनावर अजूनही कोणाला विश्वास बसत नाही. तर अजित पवारांचा बारामती विमानतळावर झालेल्या विमान दुर्घटनेतील मृ्त्यूविषयी अनेकांनी अपघात घातपात की अशी शंकाही उपस्थित केली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंदर् पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी अजितदादांचा अपघात नव्हे घात या शंकेला बळ देणारे अनेक धक्कादायक दावे समोर आणले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर 13 दिवसांनी पत्रकार परिषद घेत आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजितदादांसोबत नेमकं 28 जानेवारी मुंबईहून निघाल्यापासून ते बारामती विमानतळावरील दुर्घटनेपर्यंत नेमकं काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रम समोर आणल्यामुळे अनेकांच्या मनात पुन्हा एकदा शंकेची पाल चुकचुकली आहे.

आमदार रोहित पवार यांनी यावेळी पत्रकार परिषदेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, अजितदादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबडीत अजितदादा विमानाने बारामतीला जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट ऐनवेळी का बदलण्यात आले? व्हीएसआर कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं, त्याचा अहवाल समोर का येत नाही असे एक ना अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित करत तपासयंत्रणावर दबाव वाढवला आहे.

यावेळी रोहित पवार यांनी ‘हा अपघात होता की घात होता? यावर सर्वांची शंका हा घातच असल्याचं म्हटलं. तसेच आजच्या सादरीकरणावरून समजेल की मी प्रत्येक गोष्ट सांगितली. एक एक गोष्ट घडली. कशी घडली. कुणाचं विमान होतं. ही सर्व माहिती तुम्हाला दिली. कुणावर शंका घेतोय असं नाही. आपण फक्त वस्तुस्थिती सांगितल्याचंही रोहित पवार म्हणाले.

तसेच यावेळी रोहित पवार यांनी व्हिएसआर विमान कंपनी, अॅरो कंपनी आणि कपूर नावाचा पायलट यावर आमची शंका असल्याचं नमूद केलं आहे. या सर्व चर्चेत अॅरो नावाच्या कंपनीने व्हिएसआरचं विमान हायर केलं होतं. सरकारी जीआर नुसार घेतलं होतं. पवार नावाचा माणूस अॅरोचा हँडलर आहे. त्याने व्हिजिबिलीटी क्लिअर असल्याचं म्हटलं आहे. ही कंपनी बऱ्याच राज्यात काम करत आहे. या कंपनीचा राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचा खळबळजनक दावाही पवार यांनी यावेळी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणखी एक गंभीर बाब समोर आणताना म्हणाले, "पूर्व विदर्भाच्या एका नेत्यानं अजितदादांना एका फाईलवर सही करण्यासाठी सांगितलं होतं. ती फाईल महत्त्वाची आहे आणि आजच सही करावी असा त्या नेत्याचा आग्रह होता. पण ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी त्यांना वेळ लागला. दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला. त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेताही दादांना भेटायला येणार होता. पण तो यायला खूपच उशीर झाला. त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानानं जायचं ठरवलं. यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

तसेच अजितदादांच्या विमानाचा अपघात होताना पायलटनं मेडे कॉल का दिला नाही? विमानाचा ट्रान्सपाँडर अखेरच्या अपघाताच्या काही क्षण अगोदर का बंद करण्यात आला? पायलटला रनवे 29 चा सुरक्षित पर्याय असतानाच व त्यासाठी परवानगी दिल्यानंतरही पायलटनं रनवे 11 चा अचानक आग्रह का धरला, की त्याला अपघातच घडवायचाच होता का? असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले.

तसेच त्यांनी यावेळी अजितदादांच्या अपघाताची चौकशी ही इथल्या संस्थेने करावीच, पण त्याचसोबत फ्रान्स किंवा अमेरिकेच्या तपास संस्थांनीही करावी असंही मत रोहित पवारांनी यांनी व्यक्त केलं. तसेच याबाबत व्हिएसआर विमान कंपनी, अॅरो कंपनी आणि कपूर नावाचा पायलट यावर आमची शंका असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं.

अजितदादांच्या विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टिम अपघातावेळी बंद होती. त्यामुळे आधीच काही गोष्टी समजल्या नाहीत. विमान अत्यंत खालच्या अंतरावरून उडत होतं, मग तिथे EGPWS इशारा दिला होता की नाही? त्याचा अलर्टचा आवाज का आला नाही? अजितदादांच्या विमानाचा पायलट आणि को पायलट, दोघेही ऐनवेळी का बदलवण्यात आले? असा सवाल उपस्थित करतानाच त्यांनी दादांच्या विमानाने दुसरा गो अराऊंड का घेतला नाही? कंपनीने पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिले होते का? कुणाच्या जीवापेक्षा इंधन वाचवणे महत्त्वाचं होतं का अशी संतप्त विचारणाही रोहित पवार यांनी यावेळी केली.

तसेच याअगोदर व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. पण त्यावर पुढे काहीही तपास झाला नाही. दोन वर्षांपासून त्याचा अहवाल अद्यापही समोर आलेला नाही. तो रिपोर्ट दाबण्यात आला का? याचवेळी त्यांनी पायलट सुमीत कपूर यावर दारू प्यायल्यामुळे तीन वर्षे बंदी आणली होती अशी माहिती असतानाच त्याला व्हीआयपी लोकांच्या विमानाचा पायलट का बनवलं? असा सवाल करत प्रश्नांची सरबत्ती केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT