Pune News : पुण्यात नियुक्त असलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे हे बदलीचे चक्र महिनाभरात सुरू झाले आहे. या बदल्या मुख्यतः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांशी संबंधित असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे .
विशेष म्हणजे, दोन अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्याचे जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांची बदली पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे महासंचालकपदी करण्यात आली आहे. तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे महानगर आयुक्त योगेश म्हसे पाटील यांची मुंबईतील अल्पसंख्याक विकास विभागात सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.
या दोन्ही रिक्त पदांवर अनुक्रमे दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी येथून प्रतिनियुक्तीवर आलेले शैलेश नावल आणि नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असलेले अभिजित चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आता यानंतर पुणे जिल्ह्यातील कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डॉ. सुहास दिवसे हे प्रोबेशनरी काळापासूनच पुणे जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनी प्रांत अधिकारी, अन्नधान्य पुरवठा अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, महसूल उपआयुक्त, जिल्हाधिकारी, कृषी आयुक्त, क्रीडा संचालक आणि जमाबंदी आयुक्त अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
विशेषतः पुणे जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी तसेच पिंपरी-चिंचवड विकास प्राधिकरणासारख्या पदांवरही त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती अधिकारी म्हणून ओळखले जात असे.
येत्या काही दिवसांत पुण्यातून आणखी मोठे अधिकारी बदलले जातील, अशी शक्यता प्रशासकीय वर्तुळामध्ये व्यक्त केली जात आहे. प्रशासनातील या फेरबदलासाठी सध्या मंत्रालयात हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे आगामी काळात आयएसएस अधिकाऱ्यांबरोबरच अजितदादांना मानणाऱ्या प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनच्या ही बदल्या होण्याची शक्यता आहे. येत्या एक-दीड महिन्यात प्रशासनात ही उलथापालथ असल्याची चर्चा सुरू असून या सगळी सूत्र मंत्रालयातून फिरणार असल्याचा देखील बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.