Nagpur News: शासकीय कंत्राटदारांची सुमारे ८९ हजार कोटी रुपये महायुती सरकारने थकवले आहे. कर्जबाजारी झालेल्या एका युवा कंत्राटदाराने आत्महत्या केली तर वर्धा येथील एका कंत्राटदाराने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्य आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी वर्धा येथे मोठी घोषणा केली होती.
यापुढे कंत्राटदारांना चिंता करण्याची गरज पडणार नाही. त्यांची सर्व देणी दिली जाणार असून याकरिता साडेसात हजार कोटींची जुळवाजुळव केली असल्याचा दावा केला होता. मात्र याची कोणालाच खात्री नसल्याने कंत्राटदारांना नागपूरच्या संविधान चौकात उद्या मंगळवारी (ता.२६) भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीमुळे राज्यभरातील कंत्राटदार आंदोलन करीत आहे. यापुढे सरकारच्या योजनांचे कामे बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मतदारांना खूश करण्यासाठी कोट्यवधींच्या योजना आणि प्रकल्प जाहीर केले होते. कंत्राटदारांनी कामेही केली. मात्र त्यांना देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसेच नाहीत.
एका युवा कंत्राटदाराने आत्महत्या केल्यानंतर शासकीय कंत्राटदारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. वर्धा येथील एका कंत्राटदारानेसुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अजित पवार वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी याची दखल घेतली. ते म्हणाले, यापुढे एकाही कंत्राटदाराचे बिल पेंडिंग राहणार नाही. यासाठी साडेसात हजार कोटी रुपयांची व्यवस्था केली असल्याचे त्यांनी सांगितले.
कंत्राटदारांच्या आत्महत्या आणि थकबाकीवर दादांनी कंत्राटदारांना आता चिंता करण्याची गरज नाही. सरकार यावर गंभीर आहे. सर्वांना दिलासा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी साडेसात हजार कोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी आत्महत्येचा विचार सोडून द्यावा. यापुढे आंदोलन करण्याचीसुद्धा कोणाला गरज भासणार नाही. यापुढे एकाही कंत्राटदाराचे बिल थकीत राहणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले होते.
मात्र कंत्राटदारांना सहा महिन्यांपासून फक्त आश्वासने देणे सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही यापूर्वी बैठक झाली होती. मात्र पुढे काहीच झाले नाही. अजित पवार यांनी साडेसात हजार कोटींची व्यवस्था केल्याचे तोंडी सांगितले. कंत्राटदारांना अद्याप अधिकृतपणे कळवले नाही. थकबाकी केव्हा देणार हे सांगितले नाही. त्यामुळे आम्ही २६ ऑगस्टला राज्यातील सर्व कंत्राटदार संविधान चौकात भीक मांगो आंदोलन व धरणे आंदोलन करणार असल्याचे नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध सरोदे आणि सचिव नितीन साळवे यांनी सांगतले.
महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग,जलजीवन मिशन अ़तर्गत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे केलेली कामे व इतर अनेक विभागाकडील अंदाजे ८९ हजार कोटींची देयके प्रलंबित आहेत. त्यासाठी धरणे आंदोलन, मोर्चा, लाक्षणिक उपोषण, लोकशाही मार्गाने कंत्राटदार संघटना गेल्या १२ महिन्यांपासून प्रयत्न करीत आहेत.
मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना या विषयावर संघटनेच्या शिष्टमंडळ बरोबर बैठक घ्यावी असे तीन चार वेळा विनंती पत्रेही दिले आहे. मात्र मंत्री आणि सचिवांनी फक्त कोरडे आश्वासन दिले. हा विषय जातच नसल्याचे सरोदे म्हणाले. छोट्या कंत्राटदारांना पद्धतशीरपणे संपवले जात आहे. आता मंत्रालयातूनच कोट्यवधींचे टेंडर काढले जाते. ते बड्या कंत्राटदाराच्या घशात घातले जात आहे. टेंडरसाठी विविध शर्ती व अटी घातल्या जातात. छोट्या कंत्राटदारांना टेंडर मिळू नये यासाठी सर्व ठरवून केले जात आहे असाही आरोप कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.