Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj statue : 'पळून पळून कुठे जाणार'; असं अजित पवार का म्हणाले?

Pradeep Pendhare

Mumbai News : सिंधुदुर्ग इथं राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी केली. या प्रकरणात खोलवर जाऊन दोषींवर कारवाई केली जाईल. यात पसार झालेला पळून पळून कुठे जाणार, त्यांना शोधून कारवाई केली जाईल, असा अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या घटनेत पोलिस अ‍ॅक्शन मोडवर काम करत आहेत. स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील याला ताब्यात घेतले आहे, तर जयदीप आपटे हा पसार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुरवातीलाच संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली आहे. महाविकास आघाडीने या मुद्यावरून महायुती भाजप सरकारला चांगलेच घेरले आहे.

सत्ताधारी यावर वारंवार माफी मागत आहेत. सिंधुदुर्गला भेट देऊन घटनेची माहिती घेत आहेत. अजित पवार यांनी राजकोट किल्ल्याला आज सकाळीच भेट दिली. या ठिकाणी महाराजांच्या नावाला साजेसं स्मारक उभं करण्याचा मानस अजित पवारांनी बोलून दाखवला.

"शिल्पकार राम सुतार यांच्याशी याबाबत बोलणे झाले आहे. पाहणी झाल्यानंतर त्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली जाईल. राम सुतार देखील येऊन या ठिकाणी पाहणी करतील. सर्व गोष्टींचा विचार करून पुढचं पावलं उचलली जातील.

नेव्ही किंवा पीडब्ल्यूडी, असा वाद यामध्ये घालण्यात अर्थ नाही. आता महाराजांचे पुन्हा भव्य दिव्य स्मारक झालं पाहिजे, यासाठी सरकार लक्ष घालत आहे. जनभावना लक्षात घेऊन मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी चर्चा केली आहे", असे अजित पवार यांनी म्हटले.

कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही

"छत्रपतींचा पुतळा पुन्हा उभा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही गांभीर्याने घेत आहोत. या अपघात प्रकरणात डीपमध्ये जाऊन दोषींवर कारवाई केली जाईल. या घटनेनंतर जे पळून गेले आहेत, ते पळून पळून कुठे जाणार, त्यांना शोधले जाईल.

टेंडर कुणाला कसे दिलं, याबाबतची सर्व चौकशी केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. संपूर्ण प्रकरणाची बारकाईने चौकशी सुरू आहे. लपवाछपवी करण्याचे कारण नाही. बसून चर्चा करताना पाहणी गरजेची. यापुढे काम देताना पूर्व अनुभव आणि गरजेपुरता जेवढा वेळ आहे, तेवढा दिला जाईल", असे अजित पवार यांनी म्हटले. याशिवाय अरबी समुद्रातील स्मारक प्रकरण कोर्टात गेल्यामुळे अडकून पडल्याचेही पवार यांनी सांगितले.

नेत्यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दोन दिवसापूर्वी राजकोट किल्ल्याला भेट दिली. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे देखील यात सहभागी झाले होते.

आदित्य ठाकरेंना यावेळी भाजप नेते खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नीलेश राणे यांनी विरोध केला. राजकोट किल्ल्यावर राणे आणि ठाकरे समर्थक भिडले होते. यावर अजित पवार यांनी प्रत्येक राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, अशी सावध प्रतिक्रिया दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT