Ajit Pawar : दिवंगत अजित पवार यांच्या निधनाला आता 8 दिवस उलटून गेले आहेत. पण अजून त्यांच्या असंख्य आठवणी, मजेशीर किस्से, भावनिक प्रसंग सांगितले जात आहेत. दादांचा असाच एक नॉट रिचेबल होण्याचा आणि त्यांच्या 4 फोनचा प्रसंग सकाळचे वरिष्ठ वार्ताहर आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील यांनी सांगितला आहे.
महापालिका निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळच्या नाष्ट्याला वृत्तपत्रातील आणि काही न्यूज चॅनेलच्या रिपोर्टर्सना बोलावले होते. खरं तर त्याचदिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, दादांच्या जिजाऊ बंगल्यावर उमेदवार, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. असे असताना अजितदादा आम्हा पत्रकारांसोबत जवळपास दीड तास गप्पा मारत होते. या गप्पा गोष्टींमध्ये पत्रकारांनी दादांसोबत अनेक वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या.
या गप्पा गोष्टींमध्ये दादांना एक प्रश्न विचारला. "दादा तुम्ही एवढ्या महत्त्वाच्या पदावर असताना तुम्ही हे नॉट रिचेबल होता म्हणजे तुम्ही कुठे निघून जाता?, फोन का बंद करता?" हा प्रश्न अनेकदा पडला. त्या दिवशीही आमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न विचारायचा होता आणि योगायोगाने तो मी विचारला. त्यावर दादा मिस्कीलपण हसले. ‘‘तुम्ही ना काही बातम्या चालवता, त्या दिवशी मी बारामती हॉस्टेलला होतो, खूप गर्दी असल्याने मला महत्त्वाचे संभाषण करता येत नव्हते. त्यामुळे मी तेथून निघून थेट घरी आलो आणि मग महत्त्वाचे कॉल केले.’’
पण हे आत्ताच झालं, यापूर्वीही तुम्ही अनेकदा नाराज होऊन, चिडून नॉट रिचेबल झाला आहात असे विचारले. त्यावर ते म्हणाले, ‘‘होत कधी कधी असं. मला शांतता हवी असते. पण मी नॉट रिचेबल नसतो.’’ असे त्यांनी सांगितले. मग आमच्यापैकी एकाने विचारले. ‘‘मग तुम्ही का फोन बंद करता?’’. त्यावर दादा पुन्हा मोठ्याने हसले आणि म्हणाले, ‘‘अरे तुझ्याकडे जो नंबर आहे तो बंद असतो. माझे बाकीचे नंबर सुरु असतात.’’
तेव्हा आम्हा सगळ्यांना वाटले दादांकडे अजून एक नंबर आहे. पण दादांनी त्यदिवशी त्यांच्याकडे किती मोबाईल आहेत याचा खुलासा केला. पुढे टेबलावर ब्राऊन कलरच्या लेदरचे छोटे पाऊच होते. सोफ्याला मागे रेलून बसलेले दादा थोडे पुढे होऊन एका हाताने ते पाऊच उघडले. ‘‘अरे हे बघा माझ्याकडे चार फोन आहेत. एक नंबर खूप व्हीआयपी म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इतर महत्त्वाच्या नेते, महत्त्वाचे अधिकाऱ्यांसाठी आहे.
दुसरा फोन माझ्या घरातल्या लोकांसाठी आहे. तिसरा फोन पक्षाचे पदाधिकारी, अजून काही महत्त्वाच्या लोकांसाठी आहे. हे तीन नंबर खूप लोकांकडे नाहीत. हा चौथा जो फोन आहे त्याचा नंबर तुमच्या सगळ्यांकडे आहे. त्यावर मला कोणीही फोन करू शकतो. त्यामुळे हा नंबर बंद असला की मी तुम्हाला नॉट रिचेबल झाले असे वाटतो आणि तुम्ही त्याच्या बातम्या करता.’’ असा खुलासा दादांनी केला आणि सगळेच जोरात हसले. एकूण काय तर अजितदादा (Ajit Pawar) कधीच नॉट रिचेबल नसायचे. पत्रकार आणि सर्वसामान्य लोकांकडे जो नंबर असायचा तो फक्त बंद असायचा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.