manoj jarange patil chhagan bhujbal ajit pawar sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar : "भुजबळ प्रचाराला जातील त्या मतदारसंघातील नेता पाडा", जरांगे-पाटलांचं विधान अन् अजितदादा म्हणाले...

Akshay Sabale

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासह विविध मागण्यासाठी मराठा समाजाचे नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यादृष्टीनं राज्यात शांतता रॅली, मोर्चे आणि सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. यातच सोलापुरातील सभेत जरांगे-पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला होता.

"छगन भुजबळ प्रचाराला जातील, ती जागा पाडायची," असं विधान जरांगे-पाटील यांनी केलं होतं. यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांनी अगदी दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

जरांगे-पाटील काय म्हणाले होते?

"माढा मतदारसंघातील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ यांना घेऊन आले होते. छगन भुजबळ यांना जो मतदारसंघात घेऊन जाईल तेथील नेता पाडायचा. सोलापूरमधून याची सुरूवात झाली आहे. मराठ्यांचं वाटोळ करणाऱ्यांना सुट्टी नाही," असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला होता.

'छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांना मतदारसंघात घेऊन जाणाऱ्या नेत्याला पाडणार,' या जरांगे-पाटलांच्या विधानाबद्दल एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीनं प्रश्न विचारल्यावर 'नो कमेंट्स...' अशी प्रतिक्रिया अजितदादांनी व्यक्त केली आहे.

'पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही विनंती केली होती की शरद पवारसाहेबांवर टीका करू नका,' असा किस्सा तुम्ही नाशिकमधील कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितल्याचं बोललं जात आहे. यावर प्रश्न विचारल्यावर अजितदादांनी म्हटलं, "मी असं काही बोललो नाही. तुमच्याकडे व्हिडिओ असतील, तर दाखवा. मागे देखील मी बहुरूपी बनून दिल्लीला जात असल्याचं सांगितलं."

"राज्यात महायुतीचे 7 मेळावे"

"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत नुकतीच एक बैठक पार पडली. त्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांचा समन्वय राहण्यासाठी 6 विभाग आणि मुंबई एक वेगळा, अशा 7 विभागांत आमचे एकत्रित मेळावे होणार आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी मेळाव्याला हजर राहणार आहे. 17 ऑगस्टला आम्ही पुण्यात कार्यक्रम घेत आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात मेळावे पार पडणार आहे," अशी माहिती अजितदादांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT