Ajit Pawar Death Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar Death: बारामती पोरकी झाली! अनेक जण धाय मोकलून रडत होते...दादा आपल्यात नाहीत ही भावनाच अस्वस्थ करणारी...

Ajit Pawar Death workers emotional Reactions: . ही बातमी खरी असल्याचे समजल्यानंतर अनेक जण धाय मोकलून रडत होते. आपला नेता असा अचानक आपल्याला सोडून गेल्याचे दुःख कार्यकर्त्यांना पचवता येणे अवघड झाले होते.

मिलिंद संगई

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरल्यानंतर संपूर्ण बारामती शहर बंद झाले असून लोकांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली आहे. अनेकांना अश्रू अनावर झाले आहे.

अजितदादांचे यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाल्याची बातमी बारामतीकरांना समजल्यानंतर काही क्षण बारामतीकरांचा या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. अजित पवार यांच्या कारकीर्दीला नियतीची दृष्ट लागली आणि बारामती पोरकी झाली अशा शब्दात बारामतीकरांनी आपल्या शोकाकुल भावना व्यक्त केल्या.

अनेकांना आपले लाडके दादा आपल्यात नाहीत या बातमीवर विश्वास ठेवणे अवघड झाले होते. ज्या ठिकाणी विमान अपघात झाला त्या ठिकाणी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लोकांनी धाव घेत या बातमीची खातर जमा करण्याचा प्रयत्न केला. ही बातमी खरी असल्याचे समजल्यानंतर अनेक जण धाय मोकलून रडत होते. आपला नेता असा अचानक आपल्याला सोडून गेल्याचे दुःख कार्यकर्त्यांना पचवता येणे अवघड झाले होते.

एकमेकांच्या गळ्यात पडून कार्यकर्ते हमसाहमशी रडत होते. दादा आपल्यात नाहीत ही भावना त्यांना अस्वस्थ करून सोडणारी होती. अडचण आणि संकटाच्या काळात एखाद्या मोठ्या भावासारखा खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा आपला थोरला भाऊ आपल्यातून निघून गेल्याची जाणीव बारामतीकरांना होत असल्याचे चित्र बारामतीत पाहायला मिळाले.

मी कामाचा माणूस आहे असे प्रत्येक भाषणांमध्ये नमूद करणारे अजित पवार आज अगदी अचानक पणे आपल्यातून निघून गेले ही भावना बारामतीकरांच्या पचनी पडत नव्हती. गेल्या तीन दशकांच्या राजकीय प्रवासात राजकीय स्तित्यंतरे व अनेक चढउतारांना अत्यंत खंबीरपणे तोंड देणारे नेतृत्व म्हणून अजित पवार यांची बारामतीकरांना ओळख होती.

आज सकाळी बारामती विमानतळावर विमानाचे लँडिंग करताना झालेल्या अपघातात विमानातील सर्व जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विमान लँड करण्याचा प्रयत्न करत असताना वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज न आल्यामुळे या विमानाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे,

बारामती तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार हे आज बारामती तालुक्यात सभा घेणार होते. त्यासाठी ते मुंबईहून बारामतीला विमानाने निघाले होते. मात्र बारामती विमानतळावर त्यांचे विमान अपघातग्रस्त झाल्याने या त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अजित पवार यांना असे काही होईल याची स्वप्नतही कल्पना नसलेल्या बारामतीकरांची अवस्था आज अतिशय वेगळी होती. अवघ्या काही मिनिटात ही बातमी पसरल्यानंतर बारामती बंद झाली व लोकांनी उत्स्फूर्तपणे दवाखान्याकडे धाव घेतली.

सन 1991 पासून सातत्याने बारामती लोकसभा व विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार यांनी नेतृत्व केले आणि या परिसराचा कायापालट करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरून दाखविले. अजित पवार व बारामतीकर समीकरण इतके अतूट होते की आजपर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये देशांमध्ये किंवा राज्यामध्ये कुठलीही लाट असली तरी अजित पवार हे मोठ्या मताधिक्याने विजयी होत असत .

केवळ बारामतीच नव्हे तर पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड होती. सातत्याने विकास कामाचा पाठपुरावा करण्याचे काम ते करत होते. त्यामुळे अजित पवार यांच्या विषयी सर्वसामान्य लोकांच्या मनात कमालीची आस्था होती.

सहकार, कृषी, शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा, वैद्यकीय, बँकिंग अशा सर्वच क्षेत्रांमध्ये अजित पवार यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. राज्यात सर्वाधिक वेळा उप मुख्यमंत्री होण्याचा मान देखील त्यांच्या नावे आहे. सर्वाधिक अर्थसंकल्प देखील त्यांनी सादर केले होते.

अतिशय अभ्यासू व कष्ट करणारा नेता म्हणून अजित पवार यांनी ओळख होती. गेल्या तीन दशकांच्या राजकीय प्रवासामध्ये अजित पवार यांनी बारामतीचा सर्वांगीण विकास हे एकमेव ध्येय नजरेसमोर ठेवून वाटचाल केली. कितीही व्यस्त असले तरी आठवड्यातून किमान एकदा तरी ते बारामतीचा दौरा करीत असत जबाबदाऱ्या वाढल्यानंतर देखील त्यांनी कधीही बारामती कडे दुर्लक्ष होऊ दिले नाही प्रत्येक विकासाचे प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासाठी त्यांचा आग्रह असे.

स्पष्टवक्ता नेता

महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचा प्रवेश झाल्यानंतर अतिशय सडेतोड व परखडपणे आपली मते मांडणारा नेता म्हणून अजित पवार यांची ओळख निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात राजकारणात इतके परखड बोलून चालत नाही असे म्हटले जायचे मात्र कालांतराने अजित पवार हे काम करतात ही बाब जेव्हा बारामतीकरांच्या लक्षात आली त्यानंतर बारामतीकरांनी अजित पवार यांचा हा स्वभाव देखील स्वीकारला होता ते चुकीच्या गोष्टींना समर्थन करत नाहीत ही बाब समोर आल्यानंतर लोकांनी अजित पवार यांना मनापासून स्वीकारले होते. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून त्यांनी कायमस्वरूपी समाजकारण व राजकारण केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT