Maharashtra Politics : जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे आयोजित सत्यशोधक समाजाच्या राज्यव्यापी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनाही नव्याने सुरुवात झाली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना विलीनीकरणाच्या चर्चांना फारसा अर्थ नसल्याचे स्पष्ट केले.
ओतूर येथे सत्यशोधक समाजाच्या राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमोल कोल्हे आणि छगन भुजबळ यांची भेट झाली. विशेष म्हणजे, कार्यक्रमापूर्वी दोन्ही नेत्यांची एकाच हॉटेलमध्ये भेट झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला आणि कार्यक्रमाच्या व्यासपीठावरही त्यांच्यात चर्चा झाली. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सुरुवात झाली.
सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशातच अमोल कोल्हे आणि छगन भुजबळ यांच्या भेटीमुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारले असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
तटकरे म्हणाले की, अमोल कोल्हे आणि छगन भुजबळ यांची नेमकी भेट झाली की नाही, याची आपल्याला माहिती नाही. मात्र, छगन भुजबळ हे राज्यातील ज्येष्ठ नेते असून त्यांना राजकारणातील ४५ वर्षांचा अनुभव आहे. तर अमोल कोल्हे हे दुसऱ्यांदा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. रस्त्यात दोन नेत्यांची भेट झाली, तर त्यातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.
पुढे बोलताना तटकरे म्हणाले की, आम्ही सर्वांनी एकेकाळी एकाच पक्षात काम केले आहे. त्यानंतर अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रत्येकाचे वैयक्तिक स्नेहसंबंध कायम आहेत. त्यामुळे अशा भेटींमधून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा करणे योग्य ठरणार नाही, असे म्हणत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या भेटीबाबत छगन भुजबळ यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. अमोल कोल्हे यांची कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली आणि त्यांच्याशी चर्चा झाली. मात्र, ही चर्चा केवळ आजच्या कार्यक्रमासंदर्भात होती. तसेच अमोल कोल्हे यांच्या मालिकांबाबतही गप्पा झाल्याचे भुजबळ यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. या कार्यक्रमात त्याबाबत काय चर्चा करणार, असे स्पष्ट करत भुजबळ यांनी विलीनीकरणाच्या चर्चांचे वृत्त फेटाळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.