Amravati News : राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या विधानपरिषदेच्या पाच जागेसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थित बैठक पार पडली. यावेळी महायुतीमधील मित्र पक्षात जागावाटपाबाबत एकमत झाल्याची चर्चा असून फॉर्म्युला ठरला असला तरी पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीमधील तीनही मित्रपक्षात जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे समजते. त्यातच अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नसतानाच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते, माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी गुरुवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकावले आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नाही. त्यामुळे उमेदवार काळ असणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे नेते, माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये याठिकाणी बंडखोरी झाली आहे. 'शिक्षक आघाडी' या संघटनेच्या बॅनरखाली निवडणूक लढविण्याचा निर्धार देशपांडे यांनी केला आहे.
या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना श्रीकांत देशपांडे म्हणाले, "मी 1992 पासून शिवसेनेत कार्यरत आहे. पहिल्या दिवसापासून मी एकनाथ शिंदे यांच्या सेनेत आहे. त्यामुळे पक्षाच्या तिकिटावर माझाच पहिला अधिकार आहे. म्हणूनच मी पहिला अर्ज पक्षाकडून तर दुसरा अपक्ष म्हणून दाखल केला असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. जर पक्षाने उमेदवारी नाकारली तरीही मी निवडणुकीतून माघार घेणार नाही. उमेदवारी मिळणे हा माझा हक्क आहे. ती मिळाली नाही तर शिक्षक आघाडी' या संघटनेच्या बॅनरखाली निवडणूक लढविणार आहे.
विरोधकांवर आणि सध्या सुरू असलेल्या मोफत साड्या वाटपावर निशाणा साधताना ते म्हणाले, "साड्या वाटणारे वाटतील आणि घेणारे घेतील; पण शिक्षक मतदार अत्यंत सुज्ञ आहे, तो यावेळी ताकही फुंकून पिणार आहे." माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी कमालीची वाढली आहे.
2014 च्या विधानपरिषद निवडणुकीत अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेकडून प्रा. श्रीकांत देशपांडे निवडून आले होते. त्यानंतर 2020 ची निवडणूक त्यांनी 'शिक्षक आघाडी'चे उमेदवार म्हणून लढवली होती. परंतु अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. सध्या शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये कार्यरत असून त्यांनी पक्षाच्या माध्यमातून अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ शिक्षकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे बांधणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.