Pawan Raje Nimbalkar Murder Case Aprover Parasmal Jain : पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरणाच्या खटल्याचा निकाल अखेर २० वर्षानंतर आला आहे. या खटल्यातील प्रमुख आरोपी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व ९ आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. माफीचा साक्षीदार पारसमल जैन याने सातत्याने साक्ष बदलल्याने आरोपींविरोधात खटला चालवता येणार नसल्याचे कोर्टाने म्हंटले. याच पार्श्वभूमीवर नेमका कोण आहे पारसमल जैन? तेच पाहू
पारसमल जैन या खटल्यामधील माफीचा साक्षीदार बनला होता. या माफीच्या साक्षीदाराचा उल्लेख कोर्टानं निकालाचं वाचन करताना वारंवार केला. हाच माफीचा साक्षीदार या प्रकरणात महत्वाचा दुवा ठरला होता. पण नंतर त्यानं वारंवार आपल्या साक्ष बदलल्याचं निरिक्षण कोर्टानं यावेळी नोंदवलं. त्यामुळं हा पारसमल जैन नेमका कोण आहे? त्यानं तपास यंत्रणांपुढं वेळोवेळी काय साक्ष दिली, जाणून घेऊयात.
३ जून २००६ रोजी नवी मुंबईच्या कळंबोलीत काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या ड्रायव्हरची गोळ्या झाडून हत्या झाली होती. या प्रकरणात सीबीआयच्या तपासानुसार, मुख्य आरोपी माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी ही हत्या घडवण्यासाठी लातूरचे व्यावसायिक सतीश मंदाडे आणि मोहन शुक्ला यांच्या माध्यमातून पारसमल जैनला ३० ते ३५ लाखांची सुपारी दिली होती.
पवनराजे हत्येनंतर जवळपास ३ वर्षे पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं. मात्र, २००९ मध्ये मुंबई गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, डोंबिवली-मुंब्रा परिसरात राहणारा एक सोन्याचा व्यापारी एका दरोड्याच्या गुन्ह्यात पकडला गेल्यानंतर कोणापाशीतरी "मी एक खूप मोठं काम केलंय," अशी फुशारकी मारत आहे. पोलिसांनी जेव्हा त्याला खाक्या दाखवला, तेव्हा त्याने थेट पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येची कबुली दिली आणि शूटर (दिनेश तिवारी व इतर) लोकांची नावे सांगितली. हाच तो पारसमल जैन.
पारसमल जैन याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तो या खटल्यात 'माफीचा साक्षीदार' बनला. त्याच्या याच कबुलीच्या जोरावर सीबीआयने राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना २००९ मध्ये अटक केली होती. जैनने आपल्या जबाबात असेही म्हटले होते की, त्याला पवन राजेनिंबाळकर यांच्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनाही संपवण्याची सुपारी देण्यात आली होती.
आता विशेष सीबीआय कोर्टाने या प्रकरणाचा निकाल दिला आहे. कोर्टाने निकाल देताना स्पष्ट केले की, माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या साक्षीत सातत्य नव्हते, त्याने वारंवार जबाब बदलले. पोलिसांनी त्याला सुरुवातीला बेकायदेशीर कोठडीत ठेवून, मारहाण करून हा जबाब लिहून घेतला होता, असे निरीक्षण नोंदवत कोर्टाने त्याचा जबाब अमान्य केला. संशयाचा फायदा देऊन कोर्टाने पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.