Eknath khadse, devendra fadanvees Sarakarnama
महाराष्ट्र

Fadnavis Vs Khadse: नाथाभाऊ पुरावा द्या, लगेच कारवाई करतो; फडणवीसांनी दाखवली तयारी

Sachin Waghmare

Nagpur Winter Session 2023 : जळगावात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्याबाबत आतापर्यंत अनेक वेळा निवेदने दिली. त्यानंतर पत्र पाठवली. त्यासोबतच अनेक जणांचे पुरावे दिले. त्यानंतरही गृह विभागाकडून कारवाई केली जात नाही. याप्रकरणी आतापर्यंत ५२ पत्रे गृह विभागाला पाठवली आहेत. मात्र, जळगावातील गल्ली बोळात सुरु असलेले अवैध धंदे 'जैसे थे' च आहेत. त्यामुळे मी त्यांचे पुन्हा एकदा लक्ष वेधतो, असे म्हणत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात चौफेर टीका केली.

विधान परिषदेच्या सभागृहात सोमवारी सायंकाळी कॅसिनो व अवैध धंद्यासंबधीत एका बिलावर चर्चा सुरु होती. यावेळी त्यावर चर्चा करीत असताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी त्या विषयाशी निगडित असलेल्या जळगावातील अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत, त्यावर कारवाईची मागणी करीत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सभागृहात बोलताना खडसे यांना अधिकचा वेळ लागत असल्याने उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आवरते घ्या, असे म्हणत दोन वेळा त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, खडसे यांनी यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्कीलपणे बोलत नाथाभाऊच्या बोलण्यातील उणिवा काढल्या. दोघांचे एकमेकावर असलेले प्रेम सर्वांना माहीतच आहे. आम्ही दोघांनी एकत्रित काम केले असल्याने मी त्यांचा नेहमीच आदर करतो. त्यांच्या मागणीकडे कधीच दुर्लक्ष करीत नाही. मात्र, तुम्ही दिलेल्या पत्रात पुरावे म्हणून आपल्या राजकीय विरोधकांची नावे दिली आहेत. त्याशिवाय त्यांचे मोबाइल नंबर दिला आहे. त्यामुळे हा काही पुरावा होऊ शकत नाही . त्यामुळे तुम्ही सविस्तर पुरावे द्या.

नाथाभाऊ तुम्ही सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आहात. मी तुम्ही एकत्रित काम केले आहे. अनेक पुरावे गोळा करून सादर केले आहेत. त्यामुळे तुम्हाला नक्की काय पुरावे द्यावे, लागतात हे माहित आहे. त्याप्रमाणे सर्व पुरावे द्या, मी लगेच कारवाई करतो, असे म्हणत फडणवीसांनी कारवाई करण्याची तयारी दाखवत नाथाभाऊच्या बोलण्यातील हवाच काढली.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT