Shiv sena News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या शिवाजी पार्कवरील भाषणाची चर्चा राज्याच्या राजकारणात जोरात सुरू आहे. विशेषतः औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या राजकारणावर ठाकरे यांनी सडकून टीका केली. औरंगजेबाला याच महाराष्ट्राने गाडला हा इतिहास लोकांना कळू द्या, असे म्हणत कबरीवरील सजावट काढून तिथे हा इतिहास सांगणारा फलक लावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते.
तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्यासाहेब जोशी यांनीही औरंगजेबाचा मुद्दा अनावश्यक वाटत असल्याचे विधान नुकतेच केले. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे आणि भैय्या जोशी यांच्या मुद्द्याला हवा देत औरंगजेबाची कबर काढूनच टाकली पाहिजे. हा आमच्या स्वाभिमानाचा विषय आहे, अशी स्पष्ट भूमिका मांडली. संजय शिरसाट हे शिवसेनेचे राज्य प्रवक्ते असल्याने ही त्यांच्या पक्षाचीच भूमिका असल्याचे बोलले जाते.
कट्टर हिंदुत्व आमचेच असा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून सातत्याने केला जातो. खरी शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार आम्हीच पुढे घेऊन जात आहोत, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हिंदुत्व कधीच सोडले, अशी टीका सातत्याने केली जाते. संजय शिरसाट यांनी (Aurangzeb) औरंगजेबाच्या कबरीवरून वारंवार मांडलेली भूमिका ही त्यांच्या पक्षाचे कट्टर हिंदुत्व दाखवणारी ठरत आहे. राम जन्मभूमीसाठी आयोध्येत जेव्हा कारसेवा झाली आणि बाबरी मशीद पाडली.
तेव्हा भाजपने हे काम आमचे नाही, असे सांगत अंग झटकले होते. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 'बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे' असे जाहीरपणे सांगितले होते. शिवसेनाप्रमुखांची ती भूमिका शिंदेंची शिवसेना आजही उराशी बाळगून आहे, हेच त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादात ती उखडून फेकण्याची ठाम भूमिका कायम ठेवत दाखवून दिले.
संजय शिरसाट हे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर येथील राजकारण कायम हिंदू- मुस्लिम या जातीच्या आधारावरच केले गेले. खान पाहिजे की बाण? औरंगाबाद विरुद्ध छत्रपती संभाजीनगर या विषयांनी जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्ष सत्ताधाऱ्यांना सत्ता मिळवून दिली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका विशेषतः महापालिका डोळ्यासमोर ठेवून संजय शिरसाट यांनी ज्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच औरंगजेबाची कबर आहे त्या संभाजीनगरात ती उखडून फेकण्याची भाषा करत आमचीच शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत केलेल्या आवाहनानंतर शिरसाट यांनी औरंगजेबाची कबर उखडूनच फेकली पाहिजे ही आपली भूमिका कायम ठेवली.
छत्रपती संभाजी महाराजांचा छळ आणि हालहाल करून ज्या औरंगजेबाने त्यांना ठार मारले तो काळा इतिहास मनाला वेदना देणारा आहे. राहिला प्रश्न औरंगजेबाला गाडल्याचा तर तो नगरमध्ये मेला आणि त्याला संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे गाडले गेले. त्याला कोणी दुसऱ्याने नाही तर त्याच्या इच्छेने तो इथे दफ झाला. त्यामुळे हा काळा इतिहास जपण्याची मुळीच गरज नाही, औरंगजेबची कबर उखडूनच फेकली पाहिजे असे म्हणत संजय शिरसाट यांनी एकाच वेळी मनसे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा दोघांच्या विचाराला विरोध दर्शवला आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.