Badlapur Protest Sarkarnama
महाराष्ट्र

Video Badlapur Protest : महाजनांनी पाठ फिरवताच बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज; पोलिसांवर दगडफेक

Badlapur School Case Girish Mahajan : गिरीश महाजन हे आंदोलकांची समजूत काढण्यासाठी बदलापूर रेल्वे स्थानकात आले होते. पण त्यांच्या मध्यस्थीलाही यश आले नाही.

Rajanand More

Mumbai : बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पालकांचा मोठा उद्रेक झाला. सकाळपासून बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करणाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांसह मंत्री गिरीश महाजनांनीही केला. पण महाजनांची पाठ वळताच पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना स्थानकाबाहेर काढले आहे.

पोलिसांच्या लाठीचार्जनंतर काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटनाही घडली आहे. स्थानकात लाठीचार्जवेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अनेक आंदोलकांवर पोलिसांनी चालवलेल्या लाठ्यांमुळे पालकांमध्ये संताप वाढण्याची शक्यता आहे. आंदोलकांना स्थानकाबाहेरील रस्त्यावरुनही घालवले जात आहे. परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

आंदोलक ताब्यात

बदलापूरमध्ये लाठीचार्जदरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांनाही ताब्यात घेतले आहे. तसेच परिसरातील काही इमारतींमध्येही पोलिसांकडून आंदोलकांचा शोध घेऊन बाहेर काढले जात असल्याचे समजते. संतापलेल्या आंदोलकांनी परिसरात दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे काही वाहनांच्या काचा फुटल्या आहेत.

आंदोलक, पोलिस जखमी

लाठीचार्जमध्ये काही आंदोलक जखमी झाले आहेत. तर पोलिसांनाही दगडफेक आणि गोंधळामुळे दुखापत झाली आहे. सध्या परिसरातील स्थिती पोलिसांच्या नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे.

रेल्वेमार्ग मोकळा

बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळपासून आंदोलन सुरू असल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. सकाळपासून मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांकडूनही संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून त्यांना रेल्वेमार्गावर हटवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश आले नाही. अखेर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बळाचा वापर करून पोलिसांना आंदोलकांना पांगवावे लागले.

महाजनांनाही आले अपयश

सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन दुपारी आंदोलनाच्या ठिकाणी आले होते. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा बराचवेळ प्रयत्न केला. पण त्यांना आंदोलकांनी जुमानले नाही. उलट एका महिलेच्या आक्रोशाचा सामना त्यांना करावा लागला. त्यानंतर ते तिथून निघून गेले. त्यांची पाठ फिरताच काही वेळात पोलिसांचा फौजफाटा रेल्वेस्थानकात दाखल झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT