Deepak Kesarkar News Sarkarnama
महाराष्ट्र

Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांविरोधात घोषणाबाजी; शिवसैनिकांकडून ‘५० खोके, एकदम ओके’च्या घोषणा

Deepak Kesarkar Faces Political Tension At Shivaji Park : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथील स्मृतीस्थळावर त्यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त ठाकरे कुटुंब आणि विविध राजकीय नेत्यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

Aslam Shanedivan

Mumbai News : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर राजकीय नेते आणि शिवसैनिकांनी उपस्थित राहून त्यांना अभिवादन केले. यावेळी ठाकरे कुटुंबीयही एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी आलेले शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा आमदार दीपक केसरकर यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. केसरकर स्मृतीस्थळी दाखल होताच शिवसैनिकांनी ‘५० खोके, एकदम ओके’ अशा घोषणा देत त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. या घोषणांमुळे परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सुरुवातीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही स्मृतीस्थळी दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र येत बाळासाहेबांना अभिवादन केले. या भेटीची राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चा रंगली.

दरम्यान, शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री आमदार दीपक केसरकर हेही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते. मात्र, तेथे पोहोचताच उपस्थित शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘५० खोके, एकदम ओके’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे स्मृतीस्थळ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या घोषणाबाजीनंतर दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हा राजकीय प्रसंग नाही. हा स्मृतिदिन आहे आणि त्याचे पावित्र्य सर्वांनीच पाळले पाहिजे. त्यामुळे अशा घोषणांकडे दुर्लक्ष करणे मी अधिक सोयीचे समजतो.”

केसरकर यांनी या घटनेवर अधिक राजकीय भाष्य करणे टाळत स्मृतिदिनाच्या पावित्र्याचे महत्त्व अधोरेखित केले. मात्र, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी झालेल्या या घोषणाबाजीमुळे ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT