NCP Baramati news : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याविरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या निवडणुकीवर आपली भूमिका आज स्पष्ट केली.
राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी नवी दिल्लीत मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिनविरोध निवडणुकीसाठीची आग्रही मागणी आणि काँग्रेसच्या भूमिकेवर बोलताना सांगितले की, काँग्रेसने निर्णय घेतला आहे, तो त्यांचा अधिकार आहे. त्याची फार चर्चा करण्याचे कारण नाही.
बिनविरोधची मागणी करण्याचंही काही कारण नाही. लोकशाहीत निवडणूक लढायची असेल, तर समोरसुध्दा कोणी असेल, हे मान्य करून निवडणूक लढवावी लागते, असे पवारांनी स्पष्ट केले. निवडणुकीत प्रचार करणार का, या प्रश्नावर बोलताना पवारांनी आम्ही उमेदवार उभा केलेला नाही, असे सांगत प्रचारात उतरणार नसल्याचे संकेत दिले.
अजितदादांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट आहे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी तुम्ही काँग्रेसशी बोलावे, असे नेत्यांचे म्हणणे असल्याच्या प्रश्नावर बोलताना पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, बोलायची काय गरज आहे? अनेकजण अनेक निवडणुका लढवितात. यशस्वी होतात. राजकारणात जे पडतात, ते लोकांचे काम करण्यासाठी.
अजित पवार हे लोकांमध्ये सक्रीय होते. विकासाच्या कामांमध्ये त्यांचं लक्ष असायचं. त्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारसंघात आदर आहे. दुर्देवाने अपघाती निधनाने ते गेले. याचं दु:ख कुटुंब म्हणून आम्हा सर्वांना आहे. पवार कुटुंबात एक पध्दत आहे, कुटुंब प्रमुखांची भूमिका आमच्या कुटुंबात मानली जाते. आज कुटुंब प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे, असे पवारांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.