Avaada Company worker death Sarkarnama
महाराष्ट्र

Walmik Karad News : धक्कादायक : वाल्मिक कराडवर आरोप केलेल्या कंपनीतील कामगाराचा संशयास्पद मृत्यू

Beed Crime News Santosh Deshmukh Murder Case Avaada Wind Energy : वाल्मिक कराडवर आवादा कंपनीशी संबंधित खंडणीचा गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती.

Rajanand More

Beed News : खंडणी प्रकरणासह संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या कोठडीत आहे. त्यातच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशमुख यांच्या मस्साजोग गावातील आवादा पवन ऊर्जा कंपनीतील एका कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह केजमधील रस्त्यावर आढळून आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

वाल्मिक कराडवर आवादा कंपनीशी संबंधित खंडणीचा गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. कराड कंपनीकडे खंडणी मागत असल्याचा आरोप आहे. संतोष देशमुख हत्येचे प्रकरणही याच प्रकरणाशी जोडले जात आहे. देशमुख यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकानेही दोन दिवसांपूर्वीच कराडला अटक केली आहे.

देशमुख यांच्या हत्येनंतर आवादा कंपनी चर्चेत आली आहे. त्यातच आता कंपनीतील कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हा कामगार मुळचा पंजाबमधील असल्याचे समजते. रचपाल हमीद मसीह असे त्याचे नाव आहे. कंत्राटी कामगार म्हणून तो एका ठेकेदारामार्फत कंपनीत होता. केज शहरातील केज-अंबाजोगाई रस्त्यावर त्याचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी कामगाराचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, यासाठी शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. दरम्यान, वाल्मिक कराड आणि इतरांनी आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आपोप आह.

सीआयडी आणि एसआयटीकडून खंडणी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास केला जात आहे. आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून सातत्याने वाल्मिक कराडसह मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. त्यामुळे बीडमधील परिस्थिती सध्या तणावाची आहे. कराडला अटक केल्यानंतर तसेच कोठडी सुनावल्यानंतर परळीसह अन्य काही भागांत तणावाची स्थिती निर्माण जाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT