Bhagwat-Karad-
Bhagwat-Karad- Sarkarnama
महाराष्ट्र

कधी काळी दसरा मेळाव्याचे नियोजनकर्ते असलेले भागवत कराडांनी पंकजांचे स्टेज टाळले....

सरकारनामा ब्युरो

बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankja munde) यांचा दसरा मेळावा (Dasara Melava) आज सावरगावच्या भगवान भक्तीगडावर संपन्न झाला. यासाठी स्वत: पंकजा मुंडेसोबत खासदार प्रितम मुंडे, (Pritam munde) महादेव जानकर आणि हजारोंच्या संख्येने मुंडे समर्थक गडावर दाखल होते. मात्र या सगळ्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या गैरहजरेची. कराड हे आजच्या मेळ्याव्यासाठी उपस्थित राहिलेले नाहीत.

गोपीनाथ मुंडे यांच्या काळात भगवान गडावरील दसरा मेळाव्याचे स्टेज सांभाळणारे भागवत कराड हे पंकजा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मेळाव्याला हजेरी लावणार की नाही याची चर्चा मागच्या बरेच दिवसांपासून सुरु होती. त्यातच काही दिवसांपूर्वी, मी आता केंद्रीय मंत्री झालो आहे, त्यामुळे दसरा मेळाव्याचे बघावे लागेल, असे कराड यांनी म्हंटले होते. या वक्तव्यातून ते अनुपस्थित राहणार, असाच अंदाज व्यक्त होत होता. त्यात पंकजा मुंडेंसोबतच्या त्यांच्या मतभेद-नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर कराडांच्या त्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली होती.

आज सकाळी भागवत कराड औरंगाबादहून परळीला येतील, आणि तिथून ते गोपीनाथगडावरून हेलिकॉप्टरने पंकजांसोबत सावरगावच्या दसरा मेळाव्याला पोहोचतील अशा बातम्या आल्या होत्या. मात्र ते गैरहजर राहिले. त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने जाणार नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. हे कारण खरेही असू शकेल पण त्यामागे राजकीय कारणेही असू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावर (Bhagwangad) दसरा मेळाव्याची प्रथा सुरु केली तेव्हा भागवत कराड हे एक सर्वसामान्य कार्यकर्ता होते. तेव्हा दसरा मेळाव्याचे संपूर्ण नियोजन, स्टेजची तयारी, कार्यकर्त्यांचे नियोजन ही सर्व व्यवस्था भागवत कराड यांनी सांभाळत होते.

पंकजा-भागवत कराडांमध्ये नेमका वाद काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या नव्या मंत्रीमंडळ विस्तरात मराठवाड्यातून डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी कराड यांना शुभेच्छाही दिली नव्हती. त्यावेळी प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची आशा होती. त्यानंतर दिल्लीत जावून त्यांनी केंद्रीय नेतृत्वाची भेट घेत नाराजी व्यक्त केली होती. वरळीमधील सभेत त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर नाव न घेता टीकाही केली होती.

मात्र, त्यानंतर या नाराजींच्या चर्चांवर सारवासारव करत त्यांनी कराड यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या. या घटनेनंतर दोन ते तीन वेळा कराड आणि पंकजा मुंडे यांची भेट झाल्याने त्यांच्यात दिलजमाई झाल्याचेही बोलले जात आहे. कराड हे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्यांच्या जनआशिर्वाद यात्रेत पंकजा सहभागी झाल्या होत्या. मात्र `प्रोटोकाॅल`मुळे कराड यांनी आजचा दसरा मेळावा टाळल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT