Amit Shah Multilingual Maharashtra Sarkarnama
महाराष्ट्र

Amit Shah Multilingual Maharashtra : अमित शाहांच्या ‘बहुभाषिक महाराष्ट्र’ विधानावरून वाद; मराठी एकीकरण समिती आक्रमक

Amit Shah’s multilingual Maharashtra remark triggers a fresh Marathi language debate : नवी मुंबईतील राजभाषा संमेलनात अमित शाहांचे विधान; गोवर्धन देशमुखांचा निषेध, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरही सवाल

Pradeep Pendhare

Marathi Language Controversy : नवी मुंबईतील वाशी येथे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने आयोजित सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राबाबत केलेल्या विधानावरून राज्यात पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

‘महाराष्ट्रापेक्षा मोठे बहुभाषिक राज्य संपूर्ण भारतात नाही’, असे विधान अमित शाह यांनी हिंदी दिवसाच्या कार्यक्रमात केले. त्यांच्या या वक्तव्यावर मराठी एकीकरण समितीने तीव्र आक्षेप घेत निषेध व्यक्त केला आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. त्यामुळे अमित शाह (Amit Shah) यांच्या विधानासोबतच राज्यातील सत्ताधारी नेत्यांच्या भूमिकेवरही मराठी एकीकरण समितीने प्रश्न उपस्थित केले आहेत. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी अमित शाह यांच्या विधानाचा निषेध केला. महाराष्ट्राला ‘बहुभाषिक’ म्हणून संबोधणे हा मराठी भाषेचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘एक भाषा आणि एक धर्म देशावर लादला जात आहे. मराठी माणसांचा हा महाराष्ट्र (Maharashtra) ते कधीही सहन करणार नाहीत,’ असा आक्रमक सूर देशमुख यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेकांनी बलिदान दिले असून, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमी असल्याचेही त्यांनी म्हटले.

नवी मुंबईतील राजभाषा संमेलनाला मराठी एकीकरण समितीने सुरुवातीपासून विरोध केला होता. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. गणेश आगमनाच्या दिवशी काही कार्यकर्त्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा समितीकडून करण्यात आला. यावरूनही गोवर्धन देशमुख यांनी संताप व्यक्त केला. मराठी भाषेच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला.

फडणवीसांवरही देशमुखांचा निशाणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही देशमुख यांनी टीका केली. हिंदी भाषेबाबत मुख्यमंत्री करत असलेल्या विधानांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ‘अभिजात भाषांबरोबर तुम्ही हिंदीला मावशी म्हणता. तुम्ही मुख्यमंत्री आहात की भाषेचे नातेसंबंध जुळवत आहात?’ असा सवाल देशमुख यांनी केला. मुख्यमंत्री कार्यालयातून हिंदीचा अतिरिक्त वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, या आरोपांबाबत सरकारची अधिकृत भूमिका स्वतंत्रपणे समोर येणे आवश्यक आहे.

मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा पेटणार?

महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या वापरावरून यापूर्वीही राजकीय वातावरण तापले आहे. शैक्षणिक धोरणातील हिंदीच्या अनिवार्यतेच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात मोठा राजकीय गदारोळ झाला होता. आता अमित शाह यांच्या ताज्या विधानामुळे मराठी भाषा, हिंदीचा वापर आणि महाराष्ट्राची भाषिक ओळख हा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. अमित शाह यांच्या विधानावर विरोधक आणि मराठी संघटना आगामी काळात अधिक आक्रमक भूमिका घेतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT