Amit Shah UCC announcement Mumbai : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार असणाऱ्या 21 राज्यांमध्ये 2029 पूर्वी समान नागरी कायदा लागू करण्यात येईल, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईतून व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवस आणि मोदी यांच्या गुजरात व केंद्रातील 25 वर्षांच्या सत्तेच्या निमित्ताने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या काळामध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. याविषयी अमित शहा यांनी मुंबई (Mumbai) दौऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेत माहिती दिली. या काळात भाजप, मित्रपक्ष आणि देशातील जनता महिनाभर हे अभियान राबविणार आहे, असे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक 2029मध्ये होत असून, त्याचा संदर्भ देत ते म्हणाले, ‘‘मुस्लिम महिलांना समान अधिकार देताना तिहेरी तलाक रद्द करण्यात आला. अनेक राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आला असून, 2029पूर्वी भाजप (BJP) व ‘एनडीए’ची सरकारे असणाऱ्या राज्यांमध्ये आम्ही समान नागरी कायदा लागू करू.’’
केंद्र सरकारने भारतीय न्याय संहितेच्या माध्यमातून देशातील फौजदारी न्यायव्यवस्था आणखी बळकट केली असून, एका वर्षात अनेक राज्यांमधील गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढले आहे. तीन वर्षांमध्ये न्याय मिळेल, अशी व्यवस्था निर्माण होत आहे, असेही त्यांनी सांगितले. मणिपूरमधील राष्ट्रीय नागरिक नोंदपुस्तिकेसाठी (एनआरसी) 1951 हे आधार वर्ष मानण्याविषयी राजकीय पक्षांबरोबर चर्चा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारचा संवाद आणि चर्चेवर विश्वास आहे. लोकशाहीमध्ये नागरिकांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आणीबाणी लादू शकत नाही. ती काँग्रेसची संस्कृती आहे, अस टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले.
मुंबईसारख्या महानगरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा शोध आणि त्यांची ओळख पटविण्याबाबत विचारले असता, शहा म्हणाले, ‘‘घुसखोरांना शोधण्याची साधने आणि पद्धती गृहमंत्र्यांनी जाहीर करावी, अशी तुमची अपेक्षा आहे का? मग आम्ही त्यांना पकडणार कसे? त्यांनाही या साधनांची माहिती होणार नाही का?’’ तसेच, या देशातून प्रत्येक बेकायदा घुसखोराला बाहेर काढण्याचा आमचा निर्धार आहे. प्रत्येकाची स्वतंत्रपणे ओळख पटवून त्यांना देशाबाहेर पाठवले जाईल, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.