bjp - grapes farmer  Sarkarnama
महाराष्ट्र

भाजप कार्यकर्त्याला निवडणुकीची इच्छा महागात; तयार द्राक्ष बाग सूडातून उद्ध्वस्त

BJP Political news : लाखो रुपयांचा फटका आणि मनस्ताप वेगळा

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत (Maharashtra Nagar panchayat Election) भाजपने (BJP) दमदार कामगिरी करत ४०० पेक्षा जास्त जागा खिशात घातल्या आहेत. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shivsena) अशा पक्षांचा समावेश आहे. निकाल लागल्यानंतर आता निवडणुकीचा धुरळा खाली बसला आहे, मात्र वैयक्तिक हेवेदावे अजूनही सुरु असल्याचे दिसून येत आहे. हेच वैयक्तिक हेवेदावे मनात ठेवून सोलापूरमधील वैराग येथील एका भाजप कार्यकर्त्याची तोडणीला आलेली द्राक्ष बाग सूड भावनेने उद्ध्वस्त केल्याचा प्रकार घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथील शेतकरी आणि भाजपचे कार्यकर्ते इस्माईल पटेल (Ismail Patel) यांची ढोराळे गावात ९ एकर जमिन आहे. त्यापैकी अडीच एकर जमिनीवर त्यांची द्राक्ष बाग आहे. माणिक चमन जातींचे द्राक्ष पटेल यांच्या या बागेत होती. ही द्राक्षे तोडणीला आलेली होती. पुढील आठवड्यात ती विक्रीला देखील जाणार होती. मात्र त्यापुर्वीच अज्ञात इसमांनी बागेचे ९० टक्के नुकसान केले असल्याचा पटेल यांनी आरोप केला आहे. तसेच ठिबकची देखील मोडतोड केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याबाबत बोलाताना पटेल म्हणाले, नुकत्याच झालेल्या वैराग नगरपंचायत निवडणूक लढवण्यास मी इच्छुक होतो. मी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक सामाजिक कामात अग्रेसर असतो. पण मला तिकीट नाकारले गेले. मात्र मी निवडणूक लढवणार होतो हाच राग डोक्यात ठेऊन अज्ञात इसमांनी ९० टक्के द्राक्ष बाग जमिनदोस्त केली आहे. यामुळे आपल्याला १५ ते १८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असेही पटेल यांनी सांगितले.

इस्माईल पटेल यांनी यावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून जिल्ह्यातील आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना आपल्याला साश्रुनयनांनी न्याय देण्याची विनंती केली आहे. याबाबत पटेल यांनी वैराग पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT