Sudhakar Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Sudhakar Shinde : BMC अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांची अखेर उचलबांगडी

BMC Additional Municipal Commissioner Transfer : महानगरपालिकेत कार्यरत कसे काय असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. अखेर त्यांची बदली करत मूळ खात्यात परतण्याचे केंद्र सरकारने आदेश जारी केले आहे.

Rashmi Mane

BMC Additional Municipal Commissioner Transfer : मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांना राज्य सरकारने अखेर बदलीचे आदेश जारी केले आहेत. IRS अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे गेल्या आठ वर्षांपासून मुंबई महानगर पालिकेत कार्यरत होते. आयएएस अधिकारी नसूनही ते महानगरपालिकेत कार्यरत कसे काय असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री त्यांना हवी ती कामे करून घेतात अशी टीका विरोधकांकडून होत होती. अखेर त्यांची बदली करत मूळ खात्यात परतण्याचे केंद्र सरकारने आदेश जारी केले आहे.

आयआरएस अधिकारी सुधाकर शिंदे (Sudhakar Shinde) 2015 पासून महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना मिळणाऱ्या मुदतवाढी विरोधात विरोधक सातत्याने आवाज उठवत होते. सुधाकर शिंदेंना सातत्याने मुदतवाढ का दिली जाते? असा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष नेत्यांनी विचारला होता. त्यांच्या बदलीवरून तापलेले वातावरण शांत झाले असून त्यांची बदली परत त्यांच्या मूळ जागी करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी अतिरिक्त आयुक्त पदाचा भार आयुक्तांकडे सोपवून त्यांना आपल्या मूळ विभागात परतावे लागणार आहे.

वडेट्टीवारांनी विचारला सरकारला जाब -

"नियमबाह्य पद्धतीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार हाती घेणाऱ्या सुधाकर शिंदे यांची अखेरीस बदली झाली आहे. याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता. नोव्हेंबर 2023 पुढे सुधाकर शिंदे यांना सेवेत वाढ देता येणार नाही हा स्पष्ट उल्लेख बदलीच्या आदेशात करण्यात आला आहे. त्यामुळे नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या आठ महिन्यात सुधाकर शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. नियमबाह्य पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने आठ महिन्यात घेतलेले निर्णय सरकार रद्द करणार का? हे देखील आता सरकारने स्पष्ट केले पाहिजे." असा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विचारला आहे.

कोण आहेत सुधाकर शिंदे?

सुधाकर शिंदे हे सध्या मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होते. याआधी ते पनवेल महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे महात्मा फुले जन आरोग्य अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. सुधाकर शिंदे हे भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांचे चुलत भाऊ आहेत. डॉ. शिंदे यांनी पुणे येथील बी. जे. मेडिकल वैद्यकीय महाविदयालयातून एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. औषधनिर्माण शास्त्रामध्ये त्यांनी संशोधन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT