मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मुंबईच्या शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी फडणवीसांना चॅलेंज देत, फडणवीस यांनी, मोदींपासूनच त्यांच्यापर्यंत चेल्या चपाट्यांचं हिंदू मुस्लिम न करता केलेलं एक भाषण दाखवावं मी एक लाख रुपये देतो.
स्वकियांचा घात करणारी औलाद फक्त पक्ष्यांमध्ये नसते तर राजकीय पक्षांमध्येही आलीय. सत्ता डोक्यात गेलीय. भूगोल नीट समजून घ्या असे म्हणत राज ठाकरे यांनी वाढवण बंदर का डेव्हलट केलं जातंय याचे कारणही सांगितले. त्यांनी या बंदराला लागून गुजरात आहे. मुंबई गुजरातला न्यायची असेल तर पालघर, ठाणे जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल. मतदारसंघ फोडा, माणसं फोडा आणि मतदारसंघ ताब्यात घ्या. खासदार, आमदार, नगरसेवक आमचाच, महापालिकाही आमच्याच हातात. हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल यासाठीचा हा खेळ सुरू असल्याचा घणाघातही यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.
खासदार, आमदार, नगरसेवक आमचाच, महापालिकाही आमच्याच हातात. हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल यासाठी सुरू आहे. आमच्याकडे जातीपातीत भांडणं लावतायत. एकदा मुंबई हातातून गेली तर महाराष्ट्र झारखंडपेक्षा वेगळा करणार नाहीत. मुंबई तुमची ताकद आहे. आम्ही काहीही करू, कुठूनही मतं आणू हा मस्तवालपणा यांच्या अंगात शिरलाय.
शिवसेना मनसेच्या संयुक्त सभेत जयंत पाटील यांनी मोजक्याच शब्दांत सरकारला फटकारले. यावेळी त्यांनी, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का? लाडकी बहीणचे १५०० चे २१०० झाले का? कंत्राटदारांची बिलं मिळाली का? मुंबईकरांसाठी ठोस काय केलं का? असे प्रश्न विचारले. तसेच मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील हा विश्वासही व्यक्त केला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना मनसेची संयुक्त सभा शिवाजी पार्कवर येथे होत आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी आपण आदित्य ठाकरे यांचे भाषण ऐकले. जे चांगले झाले आहे. त्यांच्या भाषणातून मुंबईला काय पाहिजे ते माहिती असल्याचे कळाले. त्यामुळे आता तुम्ही राज्याची जबाबदारी घेऊन आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबईची दिली तर काही हरकत नाही असे त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना मनसेची संयुक्त सभा शिवाजी पार्कवर येथे होत आहे. या सभेसाठी दोन्ही पक्षांच्या २२७ सदस्यांसाठी व्यासपीठावर खुर्च्या मांडण्यात आल्या असून सभेसाठी उद्धव आणि राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आले.
मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये ठाकरे बंधूंच्या सभेला सुरूवात झाली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांचे सध्या भाषण सुरू आहे. खरी शिवसेना आपलीच, बाकी सगळ्या टोळ्या असल्याचा टोला त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त प्रचारसभा शिवाजी पार्कात होणार आहे. या सभेसाठी शिवसैनिक व मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कात धडाडणार आहे. तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू शिवाजी पार्कात एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भोसरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सुरू आहे. यादरम्यान फटाके वाजविल्यानंतर एका इमारतीच्या छतावर आग लागल्याची घटना घडली. त्याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने रोड शो सुरू असताना संबंधितांचे त्याकडे लक्ष वेधले.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून मतदारांना पैशांचे वाटप केले जात असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केला आहे. डोंबिवली येथील दशरथ भवनात हा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. पाकिटात तीन हजार रुपये भरताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचा दावा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
मुंबईतील जयजवान गोविंदा पथकातील गोविंदांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. जोगेश्वरी येथे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. मुंबई महापालिका निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांच्याकडून आपली ताकद वाढविली जात आहे.
लातूरमध्ये भाजपचा दुपटा घालून फिरणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडवलं. तो कार्यकर्ता पैसे वाटायला आला, असे समजून त्या कार्यकर्त्याची बॅगही हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला. या वेळी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आपला आमदार तर मेन कलाकार आहे, तो बरोबर चक्र चालवून सर्वांना निवडून आणणार आहे. मी जे जे बोललो आहे, ते सर्व मी करणार आहे. कारण हे सर्व नगरविकास खात्याकडे येते, ते खातं माझ्याकडं आहे. तसेच गृहनिमाण मंत्रालयही माझ्याकडे आहे, त्यामुळे तुम्हाला जे जे आश्वासन दिलं आहे, ते सर्व मी करणार आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत सांगितले.
नाशिकमध्ये परवा दोन भाऊ येऊन गेले. ते नाशिकमध्ये आले मात्र त्यांना रामाची आठवणच झाली नाही. नाशिकमध्ये येऊन ज्यांनी राम मानला नाही. आता त्यांच्यामध्ये राम उरला नाही. जो राम का नही, वो किसी का नही. काही लोक देवाचीही खिल्ली उडवू लागले आहेत. नाशिकमध्ये काम करण्याची क्षमता फक्त भाजपमध्येच आहे. होय, मी नाशिक दत्तक घेतलं होतं. त्यानंतर दोन वर्षे मी विरोधा पक्षनेता होतो. मी वर्षातून चार वेळा नाशिकला येतो, तुम्ही किता वेळा येता. निवडणुका लागल्या की नाशिकला यायचं आणि निवडणूक झाल्यानंतर नाशिकला विसरायचं. हे ठाकरे बंधू निवडणूक पर्यटक आहेत. माझं नाशिकशी आजही नातं कायम आहे. ते उद्याही कायम राहणार आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधू यांना लगावला.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन धामधुमीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुलीला तिकिट न दिल्यामुळे नाराज असलेले माजी आमदार दगडू सपकाळ हे शिवसेनेत दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सपकाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
'AIMIM ही भाजपची बी-टीम असल्याचा प्रचार काँग्रेस करत आहे. मात्र खरी बी-टीम कोण आहे, हे जगाला कळलं आहे,' असे म्हणत असदुद्दीन ओवैसींनी काँग्रेसवर टीका केली. ओवैसींनी मोदी तीन वेळा काय मुस्लिम समुदायामुळे पंतप्रधान झाले का? असा सवाल काँग्रेसला विचारला. तुम्हाला त्यांना हरवता येत नाही आणि माझे नाव घेऊन ओरडता. बिहारमध्ये केवळ पाच जागा मागितल्या, त्या दिल्या नाहीत आणि यांनी 60 जागा लढवून 6 जागा जिंकल्या, बाकीच्या जागेवर कोण जिंकले, सांगा कांग्रेसवाल्यांनो, असेही ओवैसी यांनी म्हटलं.
माजी मुख्यमंत्री भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी एका प्रचार सभेत, खा मटण आणि कमळावर दाबा बटण, असं विधान केलं होतं. अशोक चव्हाण यांच्या या विधानाचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी समाचार घेतला. मी शाकाहारी माणूस आहे. परंतु त्यांना एक किलो काय, दोन किलो मटण पाठवा, आणि घरी बसवा, असं मतदारांना आवाहन करत अशोक चव्हाण यांना टोला लागवला.
"राज्यात मोठा भ्रष्टाचार आहे, महाराष्ट्र लुटला जातोय. कमिशन खोरी वाढली असून, 25 ते 30 टक्के कमिशन सुरू झालं आहे. आज भाजप म्हणतोय आम्ही इमानदार आहोत. विकासाच्या नावाखाली जे काही उभं केलं, त्यातून त्यांनी मोठा पैसा गोळा केला. आज राज्यात प्रत्येक माणसाच्या डोक्यावर 1 लाख 86 कर्ज असून महाराष्ट्रावर 10 लाख कोटी कर्ज झालं आहे. तिघेही निवडणुका वेळी एकमेकांवर आरोप करतात. मात्र नंतर फडणवीस, अजित पावर आणि शिंदे तिघेही महाराष्ट्राला लुटून खात आहे," असे टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
नवी मुंबईत आमदार रोहित पवार यांच्याकडून बाईक रॅलीत सहभागी होऊन शक्तीप्रदर्शन केलं. याच वेळी त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले. रोहित पवार म्हणाले, "गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांची नळावरची भांडणे सुरू आहेत. सत्ताधाऱ्यांनीच पालिका लुटल्या आहेत. यांना कंटाळलेली जनता महाविकास आघाडीला मतदान करेल." मुंबई निवडणूक असल्याने देवेंद्र फडणवीस धारावीबद्दल खोटे बोलत आहेत. आधीच आदानी बरोबर करार केलेल्या धारावीत एसआरए आणि डीआरपी यांच्या अखत्यारीत पुनर्विकास करण्याचे खोटे आश्वासन देत आहेत, असाही टोला त्यांनी लगावला.
भाजपचे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, "लोकसभा निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला आणि तो मी मान्य केला. निवडणुका म्हणजे यश अपयश येत असतं. मी हरलो पण माझा पक्ष जिंकला, मी हरल्याचं दुःख नाही माझा पक्ष जिंकल्याचा आनंद आहे. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदात हरले, त्यांचा पक्ष ही हारला आहे. महापालिका निवडणुकांमध्ये त्यांच्या उरलेल्या कार्यकर्त्यांचा पराभव होणार आहे, पराभवानंतर यांचे कार्यकर्ते यांच्याकडे राहणार नाहीत."
अहिल्यानगरमधील साकळाई पाणी योजनेच्या कामाची सुरुवात येत्या पंधरा दिवसात करण्यात येईल. या पाणी योजनेच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील गावांना दुष्काळमुक्त करण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नगर तालुक्यातील सारोळा कासार इथं सुमारे तीन कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
संगमनेर शहरात कोयता गँग दहशत निर्माण करत आहे. भर बाजारपेठेत हातात कोयता घेऊन तरुण धुडगूस घालत आहे. हातात कोयता घेऊन आरडाओरड आणि शिवीगाळ केला जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित तरुणांना जेरबंद केले. मात्र भर बाजारपेठेतील घटनेने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरात वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनला आहे.
कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ अँटी करप्शन ब्युरोच्या (ACB) कोल्हापूर पथकात कार्यरत असलेल्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला असून DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. बेंगलोरवरून कोल्हापूरकडे परतताना आज पहाटे हा अपघात झाला.
जालना महापालिका निवडणुकीच्या काळात आधार कार्ड , पॅन कार्ड आणि मतदान कार्ड कचऱ्यात आढळले आहेत. शहरातील सिंधी बाजार परिसरात आधारकार्ड , पॅनकार्ड आणि मतदान कार्ड सापडली. जालना शहरासह काही ग्रामीण भागातील आधार कार्ड आणि मतदान कार्ड असल्याची माहिती समोर आली. निवडणूक आयोगाच्या FST पथकाकडून कचऱ्यात पडलेले आधार कार्ड ,पॅन कार्ड आणि मतदान कार्ड जप्त करण्यात आली आहे. आधार कार्ड 17, पॅन कार्ड 3, मतदान कार्ड 4, असे पथकाने जप्त केली आहेत.
उद्धव ठाकरेंना मुंबईत आणखी एक धक्का
माजी नगरसेवक दिलीप शिंदेंचा राजीनामा
दिलीप शिंदे हे सलग चार वेळा नगरसेवक होते
उमेदवारी न मिळाल्यामुळे दिलीप शिंदे नाराज
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी (ता. ११) जाहीर सभा होणार आहे. गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या भाजी बाजार पटांगणावर सायंकाळी सहाला सभा होत आहे.
हिंदुत्वाची आक्रमक भूमिका मांडणाऱ्या नितेश राणेंच्या सुवर्ण गड बंगल्याबाहेर बेवारस बॅगसापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या बेवारस बॅगची तपासणी सुर आहे. मागील काही दिवसापासून नितेश राणे हे आक्रमकपणे हिंदुत्वाची भूमिका मांडत आहेत. त्यामुळे मंत्री नितेश राणे यांच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न तर नाही असा संशय व्यक्त केला जात आहे. नितेश राणेंची आज छत्रपती संभाजी नगरमध्येही जाहीर सभा आहे.
मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंची शिवेसना आणि भाजप यांचा जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई बाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आणणार, असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.
लालबाग परळ भागातील माजी आमदार दगडू सपकाळ यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुलीला तिकीट न मिळाल्याने सपकाळ नाराज होते.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा आज संध्यकाळी शिवाजी पार्कवर होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात ही एकमेव संयुक्त सभा ठाकरे बंधू एकत्र घेत आहेत. जाहीस सभा घेण्यापेक्षा शाखांना भेटी देत ते कार्यकर्त्यांना बळ देत असल्याचे दिसले.
एकनाथ शिंदेंचे आमदार अर्जून खोतकर यांनी जाहीर सभेत आपला एका वर्षात वनवास संपणार असे सांगितले. एका वर्षात मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे ते म्हणाले.
महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्रित निवडणूक लढवत आहेत. असं असतानाही काही ठिकाणी दोन्ही पक्षांनी आघाडी धर्म मोडत एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. प्रचार अखेरच्या टप्प्यात आला असतानाही या वादावर तोडगा न निघाल्याने आता थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आदेश काढला आहे. त्यानुसार शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ३८-अ गटातून उभ्या असलेल्या अस्मिता भूषण रानभरे याच एकमेव अधिकृत उमेदवार असल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे काँग्रेसचे अन्य दोन्ही उमेदवार बंडखोर असल्याचे निष्पन्न झाले असून प्रभाग ३८ मधील अस्मिता रणभरे, सुनील मांगडे, सुवर्णा पायगुडे, कल्पना थोरवे व वसंत मोरे हे महाविकास आघाडीचे आता अधिकृत उमेदवार असणार आहेत.
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर–जानेवारीचा हप्ता मतदानानंतरच जमा करावा, अशी मागणी काँग्रेसने पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. १५ तारखेला मतदान होणार असताना १४ तारखेला हप्ता जमा करण्यास काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या तक्रारीवर विचार करू, असे उत्तर निवडणूक आयोगाने दिले आहे.
नंदुरबार नगर परिषदेच्या उपाध्यक्ष निवडीच्या वादातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञात जमावाने भीषण हल्ला केला. या दगडफेकीत चौधरी यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले असून हल्लेखोरांनी उभ्या गाड्या पेटवून देण्याचाही प्रयत्न केला. नंदुरबार नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश चौधरी यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर दुपारी शहरात किरकोळ वाद झाला होता, ज्याचे रूपांतर रात्री हिंसक हल्ल्यात झाले. घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, 30 पेक्षा अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पहिली सत्तेची पाच वर्षे आणि नंतरची चार वर्षे, अशी नऊ वर्षे त्रिमूर्तींनी पुण्याची वाट लावली, अशी नाव न घेता पुणे भाजपच्या नेत्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली. 'सातारा रस्ता परिसरातील उमेदवारांच्या पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ पद्मावती येथे जाहीर सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
पुण्यातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी न देता दररोज नळाद्वारे पाणी दिले जाईल. काहीजण २४/७ पाणीपुरवठा करण्याच्या गप्पा मारत असून ते कधीच शक्य होणार नाही. निवडणुकीत टँकर माफियाही उमेदवार बनले आहेत. आजपर्यंत पुणेकरांनी अनेकांना संधी दिली आहे. आम्हालाही एकहाती सत्ता देऊन संधी द्यावी, असं आवाहन करत टँकर माफियावर कडक करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्केट यार्डातील तालेरा गार्डन येथे व्यापारी मेळाव्यात ते बोलताना दिलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर काल जाहीर सभा पार पडली. यावेळी ते नाशिककरांना उद्देशून म्हणाले, 'मी आपल्याला शब्द देतो, तुम्ही नाशिक महापालिकेची सत्ता आमच्या हातात द्या. आम्ही नाशिकची आईसारखी सेवा करू.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.